ना. विखेंवर राजू शेट्टी, बच्चू कडूंची सडकून टीका
Breaking News | Radhakrishana Vikhe Patil: कर्जमाफीवरून शेतकऱ्यांवर बेताल वक्तव्ये करण्याची मालिकाच सुरु असून या यादीत आता मंत्री रधाकृष्ण विखे पाटील यांची भर.

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील मंत्र्यांसह नेत्यांची सुद्धा कर्जमाफीवरून शेतकऱ्यांवर बेताल वक्तव्ये करण्याची मालिकाच सुरु असून या यादीत आता मंत्री रधाकृष्ण विखे पाटील यांची भर पडली आहे. आधी कर्जबाजारी व्हायचं आणि नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची, हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याची मुक्ताफळे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उधळली आहेत. सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्ज माफ करून घ्यायचं, आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची, हे अनेक वर्ष काम चालू असल्याचे विखे पाटील यांनी म्हटलं आहे. विखे पाटील यांच्यावर शेतकरी नेत्यांसह सोशल मीडियातून सडकून टीका होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी देखील विखे पाटलांवर जोरदार टीका केली आहे.
अहो विखे पाटील, १९८० साली शरद जोशींनी ऊसाला प्रतिटन ३०० रुपये दर मिळावा म्हणून तुमच्या कारखान्यावर यशस्वी आंदोलन केले होते. तेव्हा तुमच्या वडीलांनी काढलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजची फी ४ हजार ५०० रुपये होती. त्याच वडिलांचे इंजिनिअरिंग कॉलेज तुम्ही आज चालवताय. त्यामध्ये इंजिनीअंरिगच्या विद्यार्थ्याला ४ लाख ५० हजार रुपये फी घेत आहात. त्याच वडीलांचा साखर कारखाना तुम्ही चालवताय, त्यामध्ये आज ऊसाला प्रतिटन ३ हजार रुपयांचा दर देताय. इंजिनिअरिंग कॉलेजच्या फी प्रमाणे ऊस दर वाढवला असता तर आज उसाला ३० हजार रुपयांचा दर मिळाला असता. मग आमचच कर्ज काय तुमच्या कारखान्यावर असलेल कर्ज सुध्दा आम्हीच फेडलं असतं असा टोला राजू शेट्टींनी राधाकृष्ण विखे पाटलांना लगावला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल, त्याला एक लाख रुपयाचे माझ्याकडून बक्षीस दिले जाईलफ अशी थेट घोषणा बच्चू कडू (इरललीं घरीं) यांनी केली आहे. तर मला जर विखे पाटलांची गाडी दिसली तर मी त्यांची गाडी फोडणार, असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिलाय. नाव राधाकृष्ण, कृत्य मात्र कंसाचं करायची असेल तर कंसाची ही अवलाद मुख्यमंत्र्यांनी हाकलून लावली पाहिजे, अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. फडवणीस साहेब ऐकीकडे कर्जमाफीची घोषणा करतात. तर दुसरीकडे हे वाचाळविळ मंत्री आहे जे असे वक्तव्य करतात. शुकरमाना लोक तुम्हाला मारत नाही, त्यामुळे ही नालायकी थांबवा, अशी प्रतिक्रिया हि बच्चू कडू यांनी यावेळी बोलताना दिली.
Breaking News: Raju Shetty, Bachchu Kadu’s harsh criticism of N. Vikhe
















































