दोस्तीत कुस्ती! मित्रानेच मित्राला मारहाण केली, त्याची दुचाकीही जाळून टाकली
Breaking News | Ahilyanagar Crime: दोन मित्रांमध्ये वाढदिवसाची पार्टी न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून मोठा वाद निर्माण.

अहिल्यानगर: गावातली साधी मैत्री, एका रात्रीत वैरात बदलली. दोन मित्रांमध्ये वाढदिवसाची पार्टी न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून मोठा वाद निर्माण झाला. त्यातूनच राग अनावर झालेल्या एका तरुणाने आपल्या मित्रावर हल्ला केला, हा हल्ला एवढा भीषण होता की, तरुणाने मित्राची मोटारसायकलदेखील पेटवून दिल्याची थरारक घटना घडली आहे.
ही घटना गुरुवारी रात्री अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील वेळापुर येथे घडली आहे. या घटनेने संपूर्ण गावात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोपीविरुद्ध कोपरगाव तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत प्रकाश बाळासाहेब गायकवाड (वय २४, रा. वेळापुर, ता. कोपरगाव, यांनी कोपरगाव तालुक्यात फिर्याद दिली असून ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास फिर्यादी प्रकाश गायकवाड हे गावातील समाजमंदिराजवळ मित्रांसोबत गप्पा मारत बसलेले असताना त्यावेळी सुनिल म्हसु जगधने हा दारूच्या नशेत तेथे आला व “तू मला वाढदिवसाची पार्टी का दिली नाहीस?” असा सवाल करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढताच त्याने फिर्यादीला हाताने चापटी मारल्या व हातातील दगडाने त्याच्या डाव्या हातावर मारहाण केली.
दरम्यान फिर्यादीच्या इतर मित्रांनी वाद शांत करत दोघांनाही घरी पाठवले असता मध्यरात्री दि. ६ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास आरोपीने फिर्यादी व त्यांच्या आई-वडिलांना शिवीगाळ करत घराचा दरवाजा लाथांनी वाजवत आणि हातातील बाटलीतील काही रासायनिक द्रव घरासमोर उभी असलेल्या स्प्लेंडर मोटारसायकलवर ओतून त्यास आग लावली.
यात मोटार सायकल पूर्णपणे जळून खाक झाली आहे. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेने वेळापुर गावात खळबळ उडाली असून, कोपरगाव पोलीसांनी आरोपी सुनिल म्हसु जगधने याच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
Breaking News: Friend beat up friend, burned his bike
















































