अकोलेत गुप्तधनासाठी पडक्या घरात खोदकाम, सहा जणांना पकडले
Breaking News | Akole Crime: एका जुन्या पडक्या घरामध्ये अघोरी प्रथा व जादूटोणा करून सोन्याची पेटी गुप्तधन सापडून देण्याच्या दृष्टीने काम करीत असलेल्या चौघा पुरुषांसह एका महिलेला राजूर पोलिसांनी रंगेहात पकडले.

राजूर: येथील एका जुन्या पडक्या घरामध्ये अघोरी प्रथा व जादूटोणा करून सोन्याची पेटी गुप्तधन सापडून देण्याच्या दृष्टीने काम करीत असलेल्या चौघा पुरुषांसह एका महिलेला राजूर पोलिसांनी रंगेहात पकडले. याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत राजूर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की रविवारी (दि.9) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, वंदना कलेक्शनसमोर गिरीश बोर्हाडे यांच्या पडक्या घरात काही लोक विधी मार्गाने काहीतरी जादूटोणा करत आहेत. माहितीची खातरजमा करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पंचांच्या उपस्थितीत छापा टाकला.
सदर ठिकाणी गेल्यानंतर पोलिसांना बोर्हाडे यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत जेसीबी मशीन चालू अवस्थेत दिसले. चौकशीअंती बोर्हाडे यांनी सांगितले, तेथे पाण्याची टाकी बांधण्यासाठी खड्डा घेतला जात आहे. मात्र घरात पाहणी केली असता, चार पुरुष व एक महिला बसलेली दिसून आली. त्यांच्यासमोर लिंबू, हळद, कुंकू, अगरबत्ती, गुलाबपाणी, काडीपेटी अशा जादूटोणा संबंधित वस्तू मिळून आल्या. शेजारच्या खोलीत खड्डा घेतलेला आणि माती उकरण्यासाठी लागणारे साहित्यही सापडले.
याप्रकरणी पोलीस शिपाई सुनील रत्नपारखी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राजूर पोलिसांनी गिरीश विनायक बोर्हाडे, सादिक बेग जाफर बेग (35, रा. वाशिम), अनिकेत सुरेंद्र काळपांडे (31, रा. अमरावती), नीलेश सुरेशराव रेवास्कर (37, रा. वाशिम), विष्णू पाराजी हजारे (74, रा. नाशिक) यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, बोर्हाडे यांच्या सांगण्यावरून त्यांनी सोन्याची पेटी जमिनीत गाडलेली आहे असा दावा करत जादूटोणा विधी सुरू केला होता. यासाठी त्यांनी बोर्हाडे यांच्याकडून दहा हजार रुपये घेतले असल्याचेही उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून सर्व जादूटोणा साहित्य जप्त केले आहे. या घटनेने राजूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Breaking News: Six people arrested for digging up abandoned house for hidden treasure
















































