अकोले ब्रेकिंग: शाळेचे गेट अंगावर पडल्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू
Akole Accident: शाळेचे गेट अंगावर पडल्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना .
अकोले : शाळेचे गेट अंगावर पडल्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी समशेरपूर येथील अगस्ति विद्यालयात शाळा उघडताना घडली. पांडुरंग बाळु सदगीर (रा. मुथाळणे, ता. अकोले) असे या घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तर या घटनेत आणखी एक विद्यार्थी जखमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज शनिवारी (१४ ऑक्टोबर) सकाळी शाळा उघडण्यापूर्वीच विद्यार्थी बाहेर जमले होते. शनिवारी सकाळची शाळा असते. त्यामुळे परिसरातील गावांतून सकाळीच विद्यार्थी आले होते. बस पहाटेच असल्यामुळे काही विद्यार्थी वेळेच्या आधीच शाळेत येतात. त्यानुसार पांडुरंग सदगीर हाही आला होता. शाळा उघडण्याची वेळ झाल्यानंतर काही विद्यार्थी गेट उघडण्यासाठी गेले. तर काही विद्यार्थी गेटमधून आत प्रवेश करण्यासाठी पुढे गेले होते.
गेट उघडत असताना ते तुटून खाली पडले. गेट पडताना पाहून काही मुले तेथून पळाल्याने वाचली. मात्र, पांडुरंग बाळु सदगीर हा दहावीतला विद्यार्थी गेटखाली दबला गेला. त्याला पळण्याची संधीच मिळाली नाही. त्याच्या डोक्याला मार लागला. गेट जड असल्याने मुलांना उचलता येत नव्हते. शिवाय गेट पडल्याने मुले घाबरली होती. त्यानंतर शिक्षक आणि मुलांनी मिळून गेट उचलले. तोपर्यंत सदगीर गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला मार लागल्याने अंतर्गत रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. तर बबलु सदगीर हा मुलगा जखमी झाला आहे.
याची माहिती मिळाल्यानंतर पालकांनी शाळेत गर्दी केली. या घटनेला शाळेच्या प्रशासनाला जबाबदार धरण्यात येत आहे. जखमी मुलाला लवकर वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा आरोपही पालकांनी केला आहे. मुलाच्या पालकांनी एकच हंबरडा फोडला आहे.
Web Title: Accident 10th standard student died after the school gate fell on him
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App