संगमनेर: प्रवरा नदीपात्रात पुलावरून पिकअप कोसळली, दोघे बेपत्ता
Sangamner Accident News: जोर्वे पिंपरणे पुलावर घडली घटना, पुलावरून पिकअप कोसळली, दोघे बेपत्ता.
संगमनेर: मालवाहतूक करणारी पिक अप जीप प्रवरा नदी पुलावरुन नदीपात्रात कोसळून वाहून गेल्याची घटना सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास जोर्वे-पिंपरणे पुलावर घडली. या घटनेत दोघे जण वाहून गेले असून एक जण बचावला आहे. (सदर माहिती ही प्राथमिक आहे)
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नाशिक येथून खिडक्यांना बसविणार्या काचा घेवून पिक अप जीप क्रमांक एम. एच 15 एफ व्ही 8943 ही ओझर येथे सोमवारी सायंकाळी आली होती. दरम्यान काचा ओझर येथे खाली करुन सदर वाहन हे नाशिककडे रवाना होत असतांना जोर्वे-पिंपरणे गावाला जोडणार्या प्रवरा नदी पुलावर आले असता नदीला आलेल्या पुरात हे वाहन गेले.
सदर वाहन नाशिकला पोहचले नसल्याने ज्या ठिकाणाहून हे वाहन आले त्या दुकानदाराने ओझर येथे फोन करुन विचारले असता सदर वाहन हे रात्री 8 वाजता काचा खाली करुन नाशिकच्या दिशेने गेले. सदर वाहनात वाहनचालकासह आणखी दोघे जण होते. मात्र वाहन नाशिकला पोहचले नसल्याने सदर वाहन हे नदीपात्रात वाहून गेले असावे असा अंदाज व्यक्त होत आहे.
याबाबत माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहचले. सकाळी पुलाचे कठाडे तुटलेले दिसले व सिमेंटचाही कठडा तुटलेला दिसल्याने, तसेच वाहनाचे चकारी दिसल्याने सदर वाहन नदीपात्रात वाहून गेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
नदीला प्रचंड पाणी असल्याने काही अंदाज घेता येत नसल्याने प्रशासनही हतबल झाले आहे. सध्या तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार व पोलीस कर्मचारी तसेच महसूलचे तलाठी हे घटनास्थळी पोहचलेले आहे.
Web Title: Accident Pickup falls from bridge in Pravara riverbed, two missing