ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालक जागीच ठार
ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॉलीसह ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालक जागीच ठार.
वाळूज महानगर: वाळू भरून जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॉलीसह ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालक जागीच ठार झाला. सुदैवाने तीन जणांनी उड्या मारल्याने ते बालंबाल बचावले. हा अपघात गुरूवारी (दि. ७) सकाळी ९ वाजेच्या सुमारास अंबेलोहळ ते वडगाव रस्त्यावरील नागझरी नदीत घडला. भारत नाथाजी दाभाडे (२२, रा. अंबेलोहळ ) असे ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. अंबेलोहळ येथील जिय सेठ याच्या ट्रॅक्टरवर भारत दाभाडे हा चालक म्हणून काम करत होता. गुरूवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास भारत हा विना नंबरच्या ट्रॅक्टरमध्ये वाळू भरून नागझरी नदीतून अंबेलोहळ येथे येत होता. यावेळी ट्रॅक्टरमध्ये चालकासह तीन (नाव समजू शकले नाही) मजूर होते. चालक भारतचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रॅक्टर ट्रालीसह नागझरी नदीतील बंधाऱ्याजवळ उलटले. यात चालक ट्रॅक्टरखाली दबल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र सुदैवाने ट्रॉलीमधील तिघांनी उडी मारल्याने ते बालंबाल बचावले.
अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोअ विनोद नितनवरे, पंकज साळवे, तुकाराम पवार, विजय पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत मयत भारत दाभाडे यास संजय दाभाडे व गौतम जाधव यांच्या मदतीने घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Accident tractor overturned and the driver died on the spot
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App