ती पार्टी ठरली अखेरची; झाडावर बाईक आदळून तीन मित्रांचा मृत्यू
Breaking News | Solapur Accident: पार्टी करून घरी परतत असताना भीषण अपघात, तीन मित्रांचा जागीच मृत्यू.
सोलापूर: सोलापूर शहरातील महावीर चौकात भीषण अपघात झाला आहे. दुचाकी झाडाला आदळून तीन मित्रांचा जागेवर मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हे तिघे पार्टी करून घरी परतत असताना हा अपघात झाला. हा अपघात मध्यरात्री दीडच्या सुमारास घडल्याची माहिती आहे.
इरण्णा बसवलिंगप्पा मठपती (२३ वर्ष, रा. गुरुदेव दत्त नगर, जुळे सोलापूर), निखिल मारुती कोळी (वय २३ वर्ष, रा,अक्षय सोसायटी, जुळे सोलापूर), दिगविजय श्रीधर सोमवंशी (वय वर्ष २१, रा. अक्षय सोसायटी, जुळे सोलापूर) अशी मयत या तिघांची नावे आहेत.
हे तिघे रात्री पार्टी करून येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघात इतका भीषण होता की, तिघांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत भर चौकात पडले होते. मध्यरात्री पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या नजरेस मृतदेह पडले आणि तिघांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती कळताच नातेवाईकांनी सोमवारी सकाळपासून शासकीय रुग्णालयात प्रचंड गर्दी केली.
निखिल कोळी याचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. रविवारी निखिलने एका कार्यक्रमात मंडप बांधले होते. निखिलला रविवारी एका कार्यक्रमामधून मंडपचे भाडे आले होते. निखिलने दोन्ही जवळच्या मित्रांना रविवारी रात्री पार्टीचे आमंत्रण दिले. इरण्णा मठपती, दिग्विजय सोमवंशी, निखिल कोळी या तिघांनी सोलापुरातील एका हॉटेलमध्ये जंगी पार्टी केली. पार्टी करून पल्सर या दुचाकी वाहनावरून घरी परत जाताना महावीर चौकात दुचाकी झाडावर जोरात धडकली. अपघात इतका भीषण होता की तिघे मित्र वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आदळले. तिघांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला, रक्तबंबाळ होऊन निखिल, दिग्विजय, इरण्णा यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने तीनही कुटुंबातील व्यक्तींनी एकच आक्रोश केला आहे.
Web Title: accident while returning home from party, three friends died on the spot
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study