निळवंडे धरणातून उद्या सोडणार शेतीचे आवर्तन
अकोले | Nilwande Dam: नगर जिल्ह्यातील जलसंजीवनी असलेल्या अकोले तालुक्यातील निळवंडे धरणातून शेतीसाठी दीर्घ मुदतीचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. ऐन उन्हाळ्यात या आवर्तनामुळे शेतीला चांगलाच फायदा होणार आहे.
भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रासाठी उन्हाळी हंगामातील शेतीचे दुसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे. हे आवर्तन उद्या दिनांक २८ एप्रिल बुधवारी सकाळी १० वाजता निळवंडे धरणातून १ हजार ४५० कुसेक विसर्गाने सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून मिळाली आहे. हे आवर्तन साधारणतः २० ते २५ दिवस सुरु राहणार आहे.
दि. २७ एप्रिल अखेर भंडारदरा धरणात ६ हजार २५७ दलघफू तर निळवंडे धरणात ३ हजार ८७० दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. या आवर्तनात अंदाजे सुमारे ३००० ते ३२०० दलघफू पाण्याचा वापर होईल असा अंदाज भंडारदरा शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली आहे.
Web Title: agricultural cycle will be released from Nilwande dam