अहिल्यानगर: पतीने केली पत्नीची हत्या
Breaking News | Ahilyanagar Crime: परप्रांतीय महिलेची तिच्या पतीने हत्या केल्याची घटना.
शेवगाव : शेवगाव येथील नेहरूनगर येथे परप्रांतीय महिलेची तिच्या पतीने हत्या केल्याची घटना बुधवारी (दि.८) रात्री घडली. याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमी रफिकूल सरदार (रा. मनोहरपूर, जि. हुगळी, पश्चिम बंगाल) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा पती इस्माइल मकसूद मलिक हा घटनेनंतर पसार झाला आहे. याप्रकरणी निर्मला भाऊसाहेब कदम (रा. नेहरूनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली. मैत्रीण मयुरी गणेश शिंदे यांच्या ओळखीचे सुमी रफिकूल सरदार व तिचे पती इस्माइल मकसूद मलिक या दोघांना भाड्याने रूम दिली होती. त्या दोघांनी त्यांचे संसारोपयोगी साहित्य रूममध्ये आणून ठेवले. त्यानंतर ते पुण्याला निघून गेले होते. त्यानंतर चार दिवासांपूर्वी येथे परत आले.
बुधवारी (दि.८) रात्री साडेनऊच्या सुमारास ते दोघे जेवण करून खोलीचा दरवाजा आतून बंद करून झोपी गेल्याचे फिर्यादी कदम यांनी पाहिले होते. गुरुवारी (दि.९) सकाळी आठच्या सुमारास सुबूद (पूर्ण नाव नाही, रा. नेहरूनगर) याने फिर्यादी कदम यांना त्या दोघांविषयी माहिती दिली. इस्माइल व त्याची पत्नी सुमी या दोघांचे रात्री कौटुंबिक कारणामुळे भांडण झाले. तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे व खोलीला कुलूप लावल्याचे इस्माइलने सुबूद याला फोन करून सांगितले. त्यानंतर फिर्यादी कदम व सुबूद त्या खोलीजवळ गेले. खोलीला कुलूप होते त्यांनी मयुरी शिंदे व पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिस आल्यानंतर खोलीचे कुलूप तोडले. तिला ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता, डॉक्टरांनी मयत घोषित केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले.
Web Title: Ahilyanagar Husband killed his wife
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News