Home अहिल्यानगर निसर्गाशी जवळीक असलेल्या आदिवासी परंपरा, संस्कृतीचे जतन व संवर्धन आवश्यक : प्रा.नितीन...

निसर्गाशी जवळीक असलेल्या आदिवासी परंपरा, संस्कृतीचे जतन व संवर्धन आवश्यक : प्रा.नितीन तळपाडे

जागतिक आदिवासी दिनानिमित्त नगर शहरात आदिवासी अस्मितेचा जागर
अहमदनगर : आदिवासी समाज हा खर्‍या अर्थाने निसर्गपूजक असून मूलनिवासी आहे. जगभरात या समाजाकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टीकोन बदलणे काळाची गरज बनली आहे. युनोने ठराव करून डिसेंबर 94 पासून जगभरात 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यास प्रारंभ केला. आदिवासी बोली, संस्कृती, परंपरा, साहित्य, देवदेवतांचा गौरव झाला पाहिजे. आदिवासी हे निसर्गपूजक व मानवतावादी आहे. ती जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. काळाच्या ओघात या संस्कृतीवर खुप अतिक्रमणे होत आहेत. या संस्कृतीकडे चुकीच्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. ते थोपविण्यासाठी समस्त आदिवासी बांधवांनी एक होणे काळाची गरज आहे. त्याचबरोबर आधुनिकतेची कास धरत शिक्षण घेत आदिवासी समाजबांधवांनी प्रगती साधली पाहिजे. नव्या पिढीपर्यंत आधुनिक ज्ञान पोहचवताना आपली मूळ संस्कृतीही रूजवली पाहिजे, असे प्रतिपादन करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील प्रा.नितीन तळपाडे यांनी केले.
नगरमधील आदिवासी सेवा संघ, आदिवासी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त शुक्रवारी भव्य मिरवणुक, विद्यार्थी गुणगौरव समारंभ घेण्यात आला. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.तळपाडे बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेतन पथक अधीक्षक संजय गंभिरे होते. याप्रसंगी व्यासपीठावर सुगी फौंडेशनचे अध्यक्ष प्रा.संदीप कोकाटे, साखर संचालक ज्ञानेदव मुकणे, उद्योजक नामदेव भांगरे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, चिंतामण आंधळे, रखमाजी मुठे, हिरा मुठे, सोमनाथ लेंभे, रंजना लेंभे, आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष विलास भारमल, जगन्नाथ सावळे, संतोष नवले, हिरामण पोपेरे, हनुमंता सोनवणे, शिवानंद भांगरे, सुरेश शेंगाळ, निवृत्ती भांगरे, रामनाथ कचरे, गंगाधर धोंगडे, शर्मिला देशमुख आदी उपस्थित होते.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त सकाळी शहरातून भव्य मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीत आदिवासी संस्कृती, आदिवासी बोली, आदिवासी साहित्य याचे दर्शन घडविण्यात आले. आदिवासी संस्कृती सर्वश्रेष्ठ संस्कृती, आदिवासी हेच खरे निसर्गपूजक, पर्यावरण, जंगले वाचवा असे संदेश देत शहरातील प्रमुख मार्गांवरुन हि मिरवणुक मार्गस्थ झाली. नगरमधील शासकीय आदिवासी वसतीगृहातील आदिवासी विद्यार्थींनी पारंपरिक पावरा नृत्य सादर करुन मुलींनी पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवले. वसतीगृहातील मुलांच्या झांजपथकानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीनंतर झालेल्या कार्यक्रमात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना संजय गंभिरे म्हणाले की, आदिवासी समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढत असले तरी ते अधिक होण्याची गरज आहे. परंपरा जपताना आधुनिक काळानुसार बदल अंगिकारले पाहिजे. शासनाच्या योजनांचा लाभ घेवून समाजबांधवांनी प्रगती साधावी असे आवाहन त्यांनी केले.
जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमात आदिवासींमधील सर्व जमातींनी एकत्र येवून भविष्याचा वेध घेत उत्कर्ष साधण्याचा निर्धार करण्यात आला. या कार्यक्रमास नगर शहरासह जिल्ह्यातील आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आदिवासी युवा संघटना, आदिवासी सेवा संघ महिला ग्रुप ,आदिवासी बहुउद्देशियसेवाभावी संस्था आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.विद्या देशमुख (भांगरे) मॅडम व श्री.सुरेश शेंगाळ सर यांनी केले,तर आभार श्री.जगन्नाथ सावळे यांनी मानले.
Website Title: Ahmednagar Adivasi Day Nitin Talpade

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here