नगरमध्ये भाजपचा उमेदवार निवडून यायला नको, एमआयएम च्या उमेदवाराची माघार
Breaking News | Ahmednagar lok sabha Election: मुस्लीम समाजाच्या विरोधानंतर MIM च्या उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली.
अहमदनगर: अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. मुस्लीम समाजाच्या विरोधानंतर MIM च्या उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली आहे. डॉ. परवेज अशरफी यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे.
सर्वच बाजूंनी टीका होऊ लागल्याने आणि समाजाच्या दबावामुळे अशरफी यांना माघार घ्यावी लागली. आज दुपारी साडेबाराच्या सुमारात ते अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात गेले आणि आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांच्यावर अनेक आरोपही केले जात होते. तसंच महत्त्वाचं म्हणजे मुस्लीम समाजातूनच त्यांना प्रचंड विरोध झाल्याचं पाहायला मिळालं. एमआयएमचा उमेदवार असल्याचा भाजपला फायदा होतो. भाजपला फायदा नको म्हणून मुस्लीम समाजाने अशरफी यांच्यावर दबाव टाकत त्यांना उमेदवारी मागे घ्यायला लावल्याचं कळतंय. होणारा विरोध पाहून तसेच भाजपचा उमेदवार निवडून यायला नको म्हणून त्यांनी माघार घेतल्याचं कळतंय. उमेदवार किंवा पक्षाची अधिकृत भूमिका अद्याप पुढे आलेली नाही. अशरफी सध्या संपर्काच्या बाहेर असल्याचं समजतंय. अर्ज मागे घेतल्यापासून ते कोणाच्याच संपर्कात नसल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्यात लढत होत आहे. प्रबळ दावेदार ठरेल असा तिसरा उमेदवार रिंगणात नाही. नंतर ‘एमआयएम’चे परवेज अशरफी यांच्यासह काही छोट्या पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावरून लंके समर्थकांनी विखे पाटील यांच्यावर आरोप केले होते. लंके यांच्या मतदारांची दिशाभूल करण्यासाठी आणि मते खाण्यासाठीच हे उमेदवार आणले गेल्याचा आरोप करण्यात आला. काही हिंदुत्ववादी पदाधिकाऱ्यांनीही अशरफी यांच्याविरोधात वक्तव्य केली होती.
Web Title: Ahmednagar lok sabha Election BJP candidate should not be elected in the city
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study