पुणे : महाराष्ट्राला मास्क मुक्त करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र लवकरच मास्क मुक्त होणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या चर्चेत कसलंही तथ्य नसल्याचं सांगितलं आहे. मंत्रिमंडळात मास्क बाबत कसलीही चर्चा झालेली अथवा निर्णय झाला नाही. या सर्व खोट्या बातम्या आहेत. त्यात काही तथ्य नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आम्ही सर्वच मास्क कायम ठेवण्याच्या मताचे आहोत. बाहेरच्या देशात मास्कची सक्ती उठवल्यानंतर त्या देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सध्या तरी मास्क हे राहिलंच पाहिजे असं आमचं मत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. अजित पवार आज पुण्यात होते. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.
मागील दोन दिवसांपासून पुण्यातील कोरोना संसर्ग कमी झाला आहे. ग्रामीण भागात 15 ते 18 वयोगटातील मुलांचं 86 टक्के लसीकरण झालं आहे. त्या तुलनेत पुणे शहर, पिंपरी चिंचडवडमध्ये लसीकरण कमी झालं आहे. आजच्या घडीला 90 हजार सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. तरी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन दुसऱ्या लाटेच्या तुलनेत अत्यंत कमी आहेत. 87 हजार रुग्ण हे गृह विलगीकरणात आहेत. 1 कोटी 61 लाख 16 हजार लोकांचे लसीकरण जिल्ह्यात झालं आहे, अशी माहिती देतानाच दोन दिवसापासून पुण्यात रुग्ण कमी होत आहेत. व ते अजून कमी व्हावी ही अपेक्षा आहे, असं अजित पवार म्हटले आहेत.
Web Title : Ajit Pawar gave information about mask free Maharashtra