अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना धडक प्रत्युत्तर, म्हणाले….
Breaking News | Ahmednagar: पैशाचा पाऊस पडत असल्याचा आरोप नगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्यावर केला.
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्याचे मतदान सुरु असून यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मतदानाच्या दिवशी अहमदनगरमध्ये आता आरोपांच्या जोरदार फैरी सुरु झाल्या आहेत. बारामतीप्रमाणे अहमदनगर लोकसभा मतदार संघात मतदानाच्या आदल्या रात्री पैशाचा पाऊस पडत असल्याचा आरोप नगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्यावर केला. तसेच कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी गावागावात पाकीट वाटत असल्याचा आरोप सुजय विखेंवर केला. यावर आता नगर दक्षिणचे महायुतीचे आमदार सुजय विखे यांनी निलेश लंके आणि रोहित पवार यांना प्रत्युत्तर दिलंय.
पारनेरचे भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे यामध्ये रस्त्यावरती पैसे पडलेले आहेत तर राहुल शिंदे गाडीच्या बाजूला उभा आहे तर राहुल शिंदे यांच्यावर पैसे वाटप करण्याचा आरोप राष्टवादी काँग्रेस शरद पवार गटाने केला. याबाबत बोलताना महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी म्हटले की , पारनेर मधील जो व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो एकाच बाजूचा असून खरा व्हिडिओ समोर येणे गरजेचे आहे.
पैसे गाडीत नव्हे तर गाडी बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे पैसे कोणाचे आहेत हे सांगायची गरज नाही. अहमदनगर जिल्ह्यातील गुंडागिरीचे राज्य पारनेर मधील जनताच उध्वस्त करणार आहे, अशी प्रतिक्रिया महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.
तसेच रोहित पवार यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देताना त्यांनी सांगितले 2019 मध्ये रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोच्या कर्मचाऱ्यांना पैसे वाटप करताना पकडले आहे. त्यांच्यावर आजही गुन्हा दाखल असल्याचा टोला सुजय विखे पाटील यांनी रोहित पवार यांना लगावला आहे. आपण काय केलं ते पाहावं आणि नंतर दुसऱ्यावर टीका टिप्पणी करावी, असेही सुजय विखेंनी म्हटले आहे. नगर मतदार संघात एकमेकांवर टीका टिप्पणी सुरु असल्याचे समोर येत आहे.
Web Title: Allegation of distribution of money in Ahmednagar
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study