अहिल्यानगरमध्ये खळबळ! अंगणवाडी सेविका अंगणवाडीतून बेपत्ता
Ahilyanagar Crime: अंगणवाडी सेविका अंगणवाडीतून बेपत्ता झाली आहे. अंगणवाडीमध्ये रक्ताचे डाग, अंतवस्त्र आढळून आले असून, घातपात झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
अहिल्यानगर : चिचोंडी पाटील (ता. नगर) येथील अंगणवाडी सेविका अंगणवाडीतून बेपत्ता झाली आहे. दरम्यान, अंगणवाडीमध्ये रक्ताचे डाग, अंतवस्त्र आढळून आले असून, घातपात झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांकडून शोध कार्य सुरू असून, रात्री उशिरापर्यंत नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद नव्हती. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, ग्रामीण विभागाचे पोलीस उपअधीक्षक संपतराव भोसले, सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी होते. चिचोंडी पाटील येथील अंगणवाडीत ड्यूटीला असलेल्या सेविका गुरूवारी सकाळी नेहमीप्रमाणे अंगणवाडीत गेल्या मात्र, संध्याकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. परंतु, त्या कोठेही आढळून आल्या नाहीत. त्यानंतर नातेवाईक व काही ग्रामस्थांनी थेट अंगणवाडीत जावून पाहणी केली असता अंगणवाडीला बाहेरून कुलूप लावले असल्याचे दिसून आले. नातेवाईक व ग्रामस्थांनी अंगणवाडीचे कुलूप तोडले असता अंगणवाडीच्या फरशीवर सर्वत्र सक्ताचा सडा पडलेला होता.
डोक्याचे केस व अंतर्वस्त्र देखील आढळून आले. फरशीवरून ओढत नेल्याच्या खुणा दिसत होत्या. त्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी परिसरात पाहणी केली असता घटनास्थळापासून काही अंतरावर काहीतरी ओढत नेल्याच्या खुणा दिसत होत्या. काही अंतरावर परत काही कपडे आढळून आले असल्याने पोलिसांनी श्वान पथकास पाचारण केले होते. दरम्यान गावतील अंगणवाडीतून अंगणवाडी सेविकाच बेपत्ता झाल्याने चिचोंडी पाटील परिसरात खळबळ उडाली आहे.
Web Title: Anganwadi worker missing from Anganwadi
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study