संगमनेर तालुका दहशतमुक्त करण्याचा निर्धार करा- ना. विखे सभा
Sangamner Assembly Election 2024: युवकांना रोजगार आणि गावांना पाणी देवू न शकणाऱ्यांना या निवडणुकीत धडा शिकवा.
संगमनेर: कोविड संकटाच्या काळात जे तुमचे झाले नाहीत ते आता तरी तुम्हाला जवळ कसे करतील, ४० वर्षांत यांनी या तालुक्याला फक्त धाक आणि दडपशाही दिली. विकासाच्या नावाखाली फक्त स्वतःला मिरवून घेतले. युवकांना रोजगार आणि गावांना पाणी देवू न शकणाऱ्यांना या निवडणुकीत धडा शिकवा. संगमनेर तालुका दहशतमुक्त करण्याचा निर्धार करा, असे आवाहन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
संगमनेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्या निवडणूक प्रचारार्थ सावरगाव तळ आणि पेमगिरी याठिकाणी आयोजित केलेल्या प्रचार सभेत मंत्री विखे पाटील यांनी हा कोणाला तरी पटण्यासारखा पुन्हा एकदा आमदार थोरात यांच्या निष्क्रीयतेवर बोट ठेवून त्यांच्या कोणत्याही भूलथापांना आता बळी पडू नका, असे आवाहन केले. संगमनेर तालुक्याची परंपरा आहे, तालुक्यातील सत्ताधाऱ्यांच्या निवडणुका अडचणीत आल्या की त्यांची धाकदडपशाही सुरू होते. यापूर्वीही झालेल्या कारखाना आणि विधानसभेच्या निवडणुकीत यांनी दहशतीनेच विजय मिळविले आहेत. यंदा तर त्यांना आता जनता थारा द्यायलाही तयार नाही त्यामुळेच आता नातेवाईक, मित्र आणि सर्वसामान्य माणसांची आठवण झाली आहे. प्रत्येकाच्या घरी जावून दबाव आणण्याचे काम सुरू झाले आहे. पण आता आपला स्वाभिमान जागृत करून, या तालुक्यात परिवर्तन घडवा असेही त्यांनी आपल्या भाषणातून सूचित केले.
चाळीस वर्षांच्या वाटचालीत आजपर्यंत फक्त दिशाभूल करण्याचे काम झाले, खोटी आश्वासनं दिली गेली. औद्योगिक वसाहतीत तीस हजार युवकांना रोजगार दिल्याचा दावा करतात, आहे का? असा प्रश्न उपस्थित करून जिथे उद्योगच आणले नाहीत तिथे रोजगारच तरी कसा उपलब्ध होणार? यांच्या सहकारी संस्था सोडल्या तर रोजगाराची कुठलीही साधनं निर्माण करू शकले नाही हेच यांचे मोठे अपयश असल्याची टीका मंत्री विखे पाटील यांनी केली. महायुती सरकारने न मागता योजना जाहीर केल्या, लाडक्या बहिणींसाठी योजना सुरु केली. एक रुपयात पीकविमा योजना सुरू करुन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात २५ कोटी रुपये जमा केले. दुधाचे अनुदान दिले, वीजबिल माफ केले. आता नव्याने सरकार येऊ द्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी सुध्दा महायुती सरकार करून दाखवेल याची ग्वाही देखील मंत्री विखे पाटील यांनी दिली.
Web Title: Assembly Election Determine to make Sangamner taluka terror free
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study