संगमनेरमधील निवडणूक चुरशीची, वाढलेला मतदानाचा टक्का परिवर्तन घडविणार?
Sangamner Assembly Election 2024: महायुतीकडून शिवसेनेतर्फे अमोल खताळ यांनी थोरातांना दिली कडवी झुंज.
संगमनेर: संगमनेर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक चांगलीच चुरशीची झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यंदा ७५.१९ टक्के उत्साही मतदान झाले असून, यापूर्वीच्या निवडणुकीच्या तुलनेत वाढलेला मतदानाचा टक्का कुणाच्या फायद्याचा ठरणार, हे चित्र उद्या (शनिवारी) स्पष्ट होईल.
एकंदरीत यंदा निवडणुकीत प्रचारच्या धुराळ्यात एकमेकांवर झालेली चिखलफेक ही अगदी हाणामाऱ्या व एकमेकांवर गुन्हे दाखल होईपर्यंत झाली. सगल नवव्या वेळेस आ. बाळासाहेब थोरात विधानसभेच्या रणांगणात बिनदिक्कतपणे सामोरे गेले तर महायुतीकडून शिवसेनेतर्फे अमोल खताळ यांनी त्यांना कडवी झुंज दिली.
संगमनेर विधानसभेची निवडणूक खऱ्याअर्थाने गाजली ती प्रतिस्पर्धी विखे-थोरात यांच्या टोकाच्या संघर्षाने. थोरातांच्या विरोधात संगमनेरातून मॅनेज न होणारा उमेदवार दिला. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील खताळ हा स्थानिक चेहरा युतीकडून दिला. प्रचारादरम्यान थोरातांविरोधात ४० वर्षांत काय केले? दडपशाही, विकास व यंदा परिवर्तन हे महत्वाचे मुद्दे प्रचाराचे केंद्रबिंदू ठरले तर त्यांना ४० वर्षे दिली, मला ५ वर्षे द्या, विकास काय असतो ते करून दाखवतो, ही भावनिक साद मतदारांना आकर्षित करणारी ठरली का? ग्रामीण व शहरी भागात थोरातांविरोधात पडणारे मतदान बघता खताळ वाढलेल्या मतदानाचा टक्का आपल्याकडे वळविण्यात कितपत यशस्वी ठरतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी नगर दक्षिणेत खासदारकीला झालेल्या पराभावाचे उट्टे काढण्यासाठी संगमनेरमध्ये चांगलेच लक्ष घातले. खताळ यांच्या पाठीशी आपली यंत्रणा उभी केली. मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ही यंत्रणा सतर्क होती. काहीही झाले तरी परिवर्तन घडवायचे असा चंगच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बांधलेला दिसून आला. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत संगमनेरमध्ये सुमारे ७२ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यावेळी तीन ते चार टक्के मतदान वाढले आहे. आजी- माजी महसूलमंत्र्यांत टोकाला गेलेला हा संघर्ष मतदानाची टक्केवारी वाढविणारा ठरला का?
त्यात महायुतीची लाडकी बहीण योजना काय करिष्मा करणार, हा महत्वाचा भाग ठरणार आहे. तसेच निवडणूक प्रक्रियेत तरुणांचा वाढलेला सहभाग कुठे कौल देतो हेदेखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आ. थोरातांना आतापर्यंत एकतर्फी व सहज जाणारी निवडणूक मतदानाच्या दिवशी मतदारसंघात मतदानकेंद्रात फेऱ्या मारणारी ठरली.
मुस्लिमबहुल भागांत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किती मते आपल्या पारड्यात वळविण्यात यशस्वी ठरतात, यावर प्रामुख्याने संगमनेर विधानसभेची चुरस प्रभावी ठरणार आहे. विखेंनी खताळांच्या पाठीशी उभी केलेली यंत्रणा तसेच न बोलणारी सुप्त लाट व उघडपणे विरोध करणारे थोरातांची डोकेदुखी ठरते काय ? खताळ या सर्वसामान्य व्यक्तीकडून संगमनेरमध्ये इतिहास घडणार का? हे उद्याचा (शनिवार) सूर्योदय ठरवणार आहे.
Web Title: Assembly Election in Sangamner is tight, increased voter
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study