खोला ते! शिंदेंचा आमदार खोका घेऊन जरांगेंच्या भेटीला
Maharashtra Assembly elections 2024: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि शिंदेसेनेचे आमदार सुहास कांदे यांची अंतरवाली सराटीत भेट.
जालना | Manoj Jarange Patil: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांचे दोन विरोधक भेटले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि शिंदेसेनेचे आमदार सुहास कांदे यांची अंतरवाली सराटीत भेट झाली.
आमदार असलेल्या सुहास कांदे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा उमेदवारी दिली आहे. पण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी बंडखोरी केल्यानं कांदे अडचणीत आले आहेत. समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदांचा राजीनामा देत अपक्ष अर्ज भरला आहे. त्यांच्या उमेदवारीनं कांदे यांची चांगलीच गोची झालेली आहे. त्यातच सुहास कांदे नावाचा अपक्ष उमेदवार रिंगणात आल्यानं शिंदेसेनेच्या आमदाराच्या समस्यांमध्ये भर पडली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर कांदेंनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचा भेट घेतली.
भुजबळांचे दोन कट्टकर विरोधक भेटत असल्यानं कांदे आणि जरांगेंची भेट चर्चेत राहिली. कांदे यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी जरांगे यांना नमस्कार केला. त्यानंतर कांदेंनी त्यांच्या खांद्यावर भगवी शाल देत सत्कार केला. मग पुष्पगुच्छ देण्यात आला. सर्वात शेवटी कांदे जरांगेंना एक खोका द्यायला गेले. हा खोका सर्वात लक्षवेधी ठरला. खोका पाहताच जरांगेंनी हात जोडले. त्यांनी तो नाकारला.
हारतुरे, सत्कार सन्मान झाल्यावर जरांगेंनी खोक्याकडे पाहत खोला ते म्हटलं. त्यानंतर कांदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून तो खोका उघडला. कांदेंनी आणलेला खोका महागडा दिसत होता. तो उघडण्यात आला, तेव्हा त्यात ड्रायफुट्स होते. ते पाहून जरांगे यांच्यासह सगळेच उपस्थित हसले. यानंतर जरांगे आणि कांदे शेजारी बसले. त्यांच्यात काही वेळ चर्चा झाली.
Web Title: Assembly elections Shinde MLA visits Jarang with a box
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study