Bhiwandi Crime : भिवंडी शहरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आता शहरातील एका हॉटेलचे शटर तोडून चोरट्यांनी पैशांचा गल्लाच पळवला असल्याचे समोर आले आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याप्रकरणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
भिवंडीतील कणेरी भागात मुकद्दर हे हॉटेल आहे. ३० जानेवारीला पहाटे अडीचच्या सुमारास एका चोरट्याने हॉटेलचे शटर जवळच्या साहित्याने उचकटून आत प्रवेश केला. यावेळी हॉटेलमध्ये एक कामगार गाढ झोपल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याला पाहून चोरट्याने गुपचूप गल्ल्यामधील सर्व रोकड खिशात टाकली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
झोपलेला कामगार जागा होऊन आपण पकडले जाऊ म्हणून या चोरट्याने फक्त गल्ल्यावरच डल्ला मारला. शिवाय झोपेत असलेल्या कामगाराच्या घड्याळसह काही वस्तू चोरट्यांनी पळवल्या आहेत. गल्ल्यात नेमके किती पैसे होते याबाबत संपूर्ण माहिती मिळाली नाही. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, चोरट्यांचा शोध आता सुरू केला आहे.
Web Title : Bhivandi Crime : Thieves opened the shutters of the hotel and looted cash