Bhiwandi Robbery : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहराला लागून असलेल्या खोणी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका वकिलाच्या घरावर 5 दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला असल्याचे समोर आले आहे. घरात घुसून एका खोलीत झोपलेल्या वयस्कर महिलेच्या गळ्यावर सूरा ठेवत तिच्या अंगावरील दागिने खेचून त्यांनी पलायन केले.
अजय पाटील हे आपल्या पत्नी मुला सह एका खोलीत तर त्यांची आई आणि सहा वर्षांची मुलगी ही दुसऱ्या खोलीत झोपले होते. रात्री अडीचच्या सुमारास आलेल्या दरोडेखोरांनी अजय पाटील यांच्या कार्यालयाची कडी कोयंडा तोडून कार्यालयात प्रवेश केला. परंतु शोधूनही हाती काही न सापडल्याने दरोडेखोर पहिल्या मजल्यावरील घराकडे वळले. दरवाजाच्या आतील कडी उचकटून आई नंदा झोपलेल्या खोलीत ते शिरले आणि त्यांच्या गळ्यावर सुरा ठेवला.
दरोडेखोरांनी गळ्यातील गंठन, हातातील बांगड्या आणि कानातील कर्णफुले हिसकावून घेतली. यावेळी घाबरलेल्या महिलेने मला मारू नका तुम्हाला काय न्यायचे ते न्या अशी विनंती दरोडेखोरांना केली. या आवाजाने त्याचवेळी त्यांची सून उठली, घरात चोर शिरल्याचे पाहून तिने जोरजोरात आरडाओरड केल्याने दरोडेखोरांनी तिथून पलायन केले. दरम्यान काही युवकांनी त्यांचा पाठलाग केला असता दरोडेखोरांनी रस्सीने बांधून आणलेले दगड ग्रामस्थांवर भिरकावुन तिथून पोबारा केला.
घाबरलेल्या कुटुंबीयांनी स्थानिक निजामपुरा पोलिसांना तात्काळ घटनेची माहिती दिली. रात्री गस्तीवर असलेले दोन पोलीस एक तासाने घटनास्थळी आले. मात्र त्यांनी सकाळी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येण्याचा सल्ला देत ते तेथून निघून आले. यामुळे स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Web Title : The robbers broke into the house around midnight