मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवास्थानाजवळ बिबट्याचा धुमाकूळ
Breaking News | Ahmednagar: रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने येथे दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
लोणी: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी गावातील निवास्थानाजवळ बिबट्याने धुमाकूळ घातलाय. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने येथे दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान सादतपूर शिवारात नरभक्षक बिबट्याची शोध मोहीम सुरू असताना बुधवारी पहाटे आणखी एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.
लोणी आणि सादतपूर येथे मुलांवर हल्ला करून त्यांना ठार करणारा नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्यासाठी वनविभागाची संपूर्ण यंत्रणा आटोकाट प्रयत्न करीत आहे. मात्र बिबट्यांची संख्या मोठी असल्याने नरभक्षक बिबट्या शोधणे त्यांच्यापुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
मंगळवारी रात्री एक बिबट्या सादतपूर शिवारात जेरबंद झाल्यानंतर बुधवारी पहाटे दुसरा बिबट्याही पिंजऱ्यात अडकला. मात्र वनविभागाची शोध मोहीम सुरूच ठेवण्यात आली आहे. त्यातच बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास लोणी-संगमनेर रस्ता ओलांडून एक बिबट्या लोणी गावातील भरवस्तीत शिरला.
तो विखे यांच्या गावातील वाड्याजवळच संचार करू लागला. विठ्ठलनगर भागातही तो फेरफटका मारीत असताना अनेक लोक रस्त्यावर उभे होते. गावात मोकाट कुत्री फिरत असल्याने अनेकांना तो बिबट्या असल्याचे लक्षात न आल्याने त्यांच्याजवळुन तो गेला. मात्र ज्यांनी बारकाईने बघितले त्यांच्या लक्षात येताच परिसरातील लोकांनी गर्दी केली.
ना. विखे यांच्या निवासस्थानाच्या मागील बाजूला असलेल्या दाट झाडीमध्ये जाताना लोकांनी बघितले. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचल्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. नागरिकांना त्यांनी घरातच थांबण्याचे आवाहन केले. रात्री उशिरा पिंजरा लावण्याचे नियोजन करण्यात येत होते. लोणी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार दहशत वाढविण्यास कारणीभूत ठरला आहे. लोणी आणि आजूबाजूच्या दहा गावांमध्ये किमान शंभर बिबटे असावेत असा अंदाज नागरिक व्यक्त करीत आहेत.
Web Title: Bibatya spotted near the residence of Minister Radhakrishna Vikhe Patil
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study