Home Accident News रस्त्यावरील खड्ड्याने दोन रिक्षा उलटल्या; बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

रस्त्यावरील खड्ड्याने दोन रिक्षा उलटल्या; बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

Bhiwandi Accident

Bhiwandi Accident : कल्याण भिवंडी मार्गावर असलेल्या पिंपळघर गावाच्या हद्दीत भरधाव रिक्षा खड्ड्यात उलटून झालेल्या अपघातात एका बाईकस्वाराला आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली होती. कल्याणहून भिवंडीकडे निघालेली रिक्षा पिंपळघर गावातील एका हॉटेलसमोर असलेल्या खड्ड्यात उलटली. त्या रिक्षा पाठोपाठ आलेली दुसरी रिक्षा त्या रिक्षावर आदळली. तर दुसऱ्या रिक्षामागून येणारा एक बाईकस्वारही रिक्षावर आदळून खाली कोसळला. मात्र या अपघातात त्या बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तसंच इतर दोन रिक्षांमधील चौघे जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून, या अपघाताची कोनगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

कल्याण – भिवंडी मार्गावर मागील साडे तीन वर्षापासून रस्ता रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. या मार्गावर आतापर्यत 10 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर 50 हून अधिक प्रवासी तसेच वाहन चालक जखमी झाले आहेत. त्यातच पिंपळघर गावाच्या हद्दीत एका हॉटेल समोर अर्धवट असलेल्या सिमेंट रस्त्यावर मधोमध एक खड्डा आहे. या खड्ड्यात आज पहाटेच्या सुमारास हा विचित्र अपघात झाला. या भीषण अपघातात दुचाकीवरील अकिब शेख (28) याचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षातील चार जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मृतक अकिब शेख हा कोनगाव मधील राहणारा होता. आज पहाटे पाचच्या सुमारास दुचाकीवरून रोजच्या प्रमाणे तो आपल्या कंपनीत कामावर जाण्यासाठी निघाला असता त्याचा अपघाती मृत्यू झाला. मृत अकिब शेख हा विवाहित असून त्याला तीन मुलं आहेत. शिवाय आई वडील आणि भाऊ यांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्याच्या एकट्यावर होती. त्याच्या अपघाती निधनाने शेख कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतकाच्या लहान भावाने या अपघाताला रस्त्याचे काम करणारे ठेकेदार व संबंधित विभागाचा अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी देखील केली आहे. ठेकेदाराने रस्त्यात खड्डा खोदून ठेवला आहे. शिवाय या खड्ड्या भोवती नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही दक्षता अथवा सूचना फलक नसल्याने हा विचित्र अपघात झाल्याचे मृतकाच्या नातेवाईकाने सांगितले आहे.

Web Title : Bike rider killed in road accident in Bhiwandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here