धक्कादायक! निर्जनस्थळी बॉडी, हात-पाय बांधलेले अन् शीर गायब, ओळख पटविण्याचे आव्हान
Breaking News | Pune Crime: शिरगांव गावच्या हद्दीत एका अज्ञात व्यक्तीचा शीर नसलेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली.
पुणे: भोर-महाड मार्गावरील वरंध घाटातील शिरगांव गावच्या हद्दीत एका अज्ञात व्यक्तीचा शीर नसलेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शिरगांवमधील दुर्गम डोंगराळ भागात हातपाय बांधलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला आहे. यामुळे हा घातपाताचा प्रकार असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शिरगांव परिसरात काही स्थानिक गुराखी हे गुरे चारण्यासाठी डोंगराळ भागात गेले होते. त्यावेळी त्यांना तिथे उग्र वास येऊ लागला. त्यामुळे त्यांचा संशय बळावला. त्यामुळे त्यांनी त्या परिसराची पाहणी केली. तेव्हा काही अंतरावर एका निर्जन ठिकाणी हातपाय बांधलेल्या अवस्थेत शीर नसलेला मृतदेह आढळून आला. हे पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ भोर पोलिसांना दिली. माहिती मिळताच भोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरीय तपासणीसाठी नजीकच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आसपासच्या गावांमध्ये चौकशी सुरू केली आहे. मृतदेहाचे शीर नसल्याने आणि हातपाय बांधलेले असल्याने हा खून नियोजनबद्धरित्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी मृतदेह सापडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर शीर शोधण्यासाठी शोधमोहीम सुरु आहे. मात्र, अद्याप या धडाचं शीर सापडलेलं नाही. पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. परिसरात मात्र या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Web Title: Body found in deserted place, hands and feet tied and head missing