खा. लोखडेंसाठी आज मुख्यमंत्री संगमनेर, श्रीरामपुरात
Ahmednagar Lok Sabha Election 2014: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने संगमनेर व श्रीरामपूर या ठिकाणी बुधवारी, ८ मे रोजी जनतेशी संवाद साधणार, संगमनेर, श्रीरामपुरात सभा.
राहाता: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने संगमनेर व श्रीरामपूर या ठिकाणी बुधवारी, ८ मे रोजी जनतेशी संवाद साधणार आहेत. संगमनेर येथे दुपारी दोन वाजता तर श्रीरामपूर येथे सायंकाळी ५ वाजता सभा होणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रमुख कमलाकर कोते व नितीन औताडे यांनी दिली.
मतदारसंघात एकाच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या दोन सभा होणार असल्याने महायुतीचे कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. पंतप्रधान मोदींच्या नगर येथील येथील सभेनंतर मुख्यमंत्री शिर्डी मतदारसंघात येणार असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यासह माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक प्रचारात सक्रीय झाल्याने ही सभा जंगी करण्याचा मानस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या सभेपूर्वी युवा सेनेच्या वतीने मुख्यमंत्र्याचे मोटारसायकल रॅलीने स्वागत होणार आहे. संगमनेरची सभा उन्हामुळे मैदानाऐवजी मालपाणी लॉन्स येथे होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. ही सभा यशस्वी करण्याची जबाबदारी आमदार किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, शहर प्रमुख विनोद सुर्यवंशी यांच्यावर आहे. त्याचबरोबर भाजपचे तालुका प्रमुख सिताराम भांगरे, वैभव लांडगे, संगमनेर शहर प्रमुख श्रीराम गणपुले, अमोल खताळ, सुजीत क्षिरसागर यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपील पवार सभा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. संगमनेर व श्रीरामपूरमध्ये महायुतीचे विद्यमान आमदार नसतानाही सभा यशस्वी करण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. प्रतिसाद पाहता दोन्ही ठिकाणच्या सभा यशस्वी होतील, असा विश्वास कोते व औताडे यांनी व्यक्त केला. श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांचा प्रचार सुरू केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मतदार संघात तिसऱ्यांदा येत आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह आमदार आशुतोष काळे, आमदार किरण लहामटे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड, भानुदास मुरकुटे, बाळासाहेब मुरकुटे हे सर्व प्रचारात सक्रीय झाल्याने रंगत वाढली आहे.
Web Title: Chief Minister Eknath Shinde Sangamner, Shrirampur today for Lokhande
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study