ठरलं! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 5 डिसेंबरला शपथ घेणार
Maharashtra Assembly Election Results 2024 | Maharashtra CM: भाजपकडून काही नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची चिन्हे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र मुख्यमंत्री पदावरून सत्ता स्थापनेला वेळ लागत असल्याची चर्चा आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असे संकेत देण्यात आले. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरे गावी गेल्याने ते नाराज असल्याचे बोलले जातेय.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. मात्र, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर रोजी दुपारी १:०० वाजता होणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
भाजपचा गटनेता २ डिसेंबरला निवडला जाणार असून दुपारी १:०० वाजता विधानभवनात गटनेता निवडीसाठी भाजपची बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. त्यावेळीच भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा स्पष्ट होणार असल्याची माहिती आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही वेळापूर्वी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची ऑनलाईन बैठक घेतली. त्यामध्ये, भाजपच्या आमदारांनी सरकार स्थापनेपूर्वी आणि स्थापनेनंतर काय-काय काळजी घ्यायची यासंदर्भात या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले आहे. ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधीला उपस्थित राहण्याच्या सूचना सर्व आमदारांना देण्यात आल्या आहेत.
तसेच, महायुती सरकारचा शपथविधी होत असताना आपापल्या जिल्ह्यांमध्ये जल्लोष करण्याचे देखील बावनकुळे यांनी सांगितले. यासह प्रत्येक जिल्ह्यातून भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी शपथविधीला उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. ५ डिसेंबर रोजी दुपारी १:०० वाजता मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री व बडे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
Web Title: Chief Minister of Maharashtra will take oath on December 5
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study