संगमनेर: बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलाचा मृत्यू
Breaking News | Sangamner: चार वर्षांच्या मुलावर घराजवळच बिबट्याने हल्ला करून ठार (Dies) केल्याची घटना.
संगमनेर: लोणीतील घटनेला अवघे बारा दिवस उलटले असताना लोणीपासून तीन किलोमीटर अंतरावरील सादतपूर शिवारात भरदुपारी हर्षल राहुल गोरे या चार वर्षांच्या मुलावर घराजवळच बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेने मुलांचे जगणे असुरक्षित झाल्याची भावना निर्माण झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
१४ जानेवारी रोजी राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे अथर्व लहामगे या नऊ वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून ठार केले होते. वन विभागाची टीम लोणी परिसरात ठाण मांडून असताना त्यांना एवढ्या दिवसात नरभक्षक बिबट्या जेरबंद करता आला नाही. उलट गुरुवारी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास लोणी गावापासून अवघ्या तीन किलोमिटर अंतरावरील संगमनेर तालुक्यातील सादतपूर शिवारात राहुल मच्छिंद्र गोरे यांचा चार वर्षांचा मुलगा आपल्या चुलत भावासोबत आपल्या घराकडून चुलत्यांच्या घराकडे जात होता. दोन घरांमध्ये अवघे दिडशे फूट अंतर आहे आणि ही मुले रोज ये-जा करीत असतात. मात्र गुरुवारी बिबट्याच्या रुपाने काळाने घाला घातला आणि हर्षलला मृत्यूने कवटाळले.
गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हर्षलवर हल्ला करून मकाच्या शेतात ओढून नेले. त्याच्यासोबत असलेला मुलगा घाबरून गेला आणि वाघ-वाघ म्हणत ओरडत घराकडे पळाला. आजूबाजूच्या लोकांना लवकर काय घडले हे समजू शकले नाही. मात्र मेंढपाळ आणि गोरे कुटुंबातील लोकांनी धाडस करून मकाच्या शेतात धाव घेतली. लोकांना बघून बिबट्या निघून गेला, परंतु तोपर्यंत त्याने हर्षलच्या शरिराचे अनेक लचके तोडलेले होते. हर्षलला लोणीच्या प्रवरा रुग्णालयात आणण्यात आले. पण काही वेळातच त्याची प्राणज्योत मालवली. हर्षल एकुलता एक मुलगा होता. त्याला दीड वर्षांची एक बहीण आहे. जिरायती भागातील शेतकरी, कष्टकरी कुटुंब म्हणून या कुटुंबाची ओळख आहे.
Web Title: Child dies in leopard attack
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study