मढी येथे अध्यक्षपदावरून दोन गटांत हाणामारी
Ahmednagar News | Pathardi: मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातील दोन गटात अध्यक्ष पदावरून हाणामारी झाल्याची घटना.
पाथर्डी: तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातील दोन गटात अध्यक्ष पदावरून हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीत सातजण जखमी झाले. यावेळी झालेल्या तुफान हाणामारीत लाठ्या, काठ्या व गजाचा वापर करण्यात आला असून या घटनेत देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा मढीचे सरपंच संजय मरकड हे गंभीर जखमी झाले आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी विश्वस्त शिवजीत डोके यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सहा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या हाणामारीत अध्यक्ष संजय मरकड, शिवजीत डोके यांच्यासह संकेत मरकड, प्रतीक काळदाते, सुनील निमसे, अक्षय कुटे, प्रसाद डोके हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरूवारी (दि.14) सकाळी देवस्थानच्या नवीन अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार होती. या बैठकीसाठी बारा पैकी दहा विश्वस्त बैठकीसाठी आले होते. मात्र, एका गटाने ज्या ठिकाणी बैठक होेती, त्या हॉलला कुलूप लावत बैठक होणार नाही, असा पवित्रा घेतल्यानंतर संजय मरकड व शिवजीत डोके यांच्यात शाब्दिक वादाला सुरवात झाली.
हा वाद विकोपाला जाऊन दोन्ही गटात हाणामारी झाली. या हाणामारीत सहभागी झालेल्या काही तरूणांकडे परवाना असलेले रिव्हॉलर होते. मात्र, त्याचा वापर न झाल्याने मोठी दुर्घटना टळली. हाणामारीचा हा प्रकार कानिफनाथांची समाधी असलेल्या मुख्य गडावर घडल्याने याठिकाणी आलेल्या भाविकांची पळापळ झाली. तर या घटनेची माहिती कळताच मढीच्या ग्रामस्थांनी गडाकडे धाव घेतली. या घटनेतील सर्व जखमी पाथर्डी पोलीस स्टेशनला व उपजिल्हा रुग्णालयात आल्यानंतरही मोठी गर्दी याठिकाणी जमा झाली होती.
याबाबत शिवजीत डोके यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संजय मरकड, संकेत मरकड, दत्ता मरकड, अक्षय कुटे, बाळासाहेब मरकड, प्रतीक काळदाते व इतर दहा ते पंधरा अज्ञात व्यक्तींविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Clash between two groups over the post of president in Madhi
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App