अहिल्यानगर: पुन्हा थंडीची लाट, किती दिवस थंडीचा जोर कायम राहणार
Breaking News | Weather Update: उत्तर भारतातून वाहणारे पूर्वीय, थंड हवेचे वारे आणि हवेचा स्थिर होत चाललेला दाब यामुळे राज्यात पुन्हा थंडीची लाट निर्माण झाली.

अहिल्यानगर: महाराष्ट्रात मागील आठवडाभर गायब झालेली थंडी पुन्हा अवतरली असून राज्यातील अनेक शहरांत शनिवारी (29 नोव्हेंबर) रात्रीपासून तापमान झपाट्याने घसरले आहे. उत्तर भारतातून वाहणारे पूर्वीय, थंड हवेचे वारे आणि हवेचा स्थिर होत चाललेला दाब यामुळे राज्यात पुन्हा थंडीची लाट निर्माण झाली आहे. हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार येणारा पूर्ण आठवडा (7 डिसेंबरपर्यंत) महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
शनिवार ते शनिवार (दि. 22 ते 29 नोव्हेंबर) या आठवडाभर तापमानात वाढ अनुभवलेली असताना, शनिवारी (29 नोव्हेंबर) रात्रीपासून तापमानात अचानक घट नोंदवली गेली. नगर, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यातील जेऊरमध्ये तर थंडीची लाट जाणवेल इतकी तपमानात घसरण नोंदली गेली. थंडीची लाट असलेली शहरामध्ये नाशिक, अहिल्यानगर, जेऊर (सोलापूर) येथील तापमान सरासरी किमान तापमानापेक्षा तब्बल 4 ते 5 अंशांनी खाली घसरले असल्याने हवामान विभागाने थंडीची लाट सदृश्य स्थितीची नोंद केली आहे. राज्यातील अनेक शहरांतही तापमानात लक्षणीय घट झाली असून या ठिकाणीही थंडीची ठसठशीत चाहूल जाणवू लागली आहे. यामध्ये पुणे, मुंबई (सांताक्रूझ), रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, वाशिम या शहरांचा समावेश आहे.
खुळे यांनी सांगितले की, उत्तर भारतातून येणारे ईशान्येकडील वारे महाराष्ट्रात पूर्वीय होत असून वातावरणातील दाब 1014 हेक्टपास्कलपर्यंत स्थिरावला आहे. त्यामुळे येत्या संकष्ट चतुर्थीपर्यंत (7 डिसेंबर) राज्यात थंडीचा जोर कायम राहणार आहे. सकाळी धुक्याचे प्रमाण वाढण्यासह, ग्रामीण भागांत चटई थंडीचा अनुभव अधिक तीव्रतेने जाणवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सध्या अरबी समुद्रातून सरकणारे ‘डिट-वाह’ हे चक्रीवादळ रविवारी रात्री कमकुवत होण्याच्या स्थितीत असून महाराष्ट्रावर त्याचा कोणताही विशेष परिणाम होणार नाही. काही ठिकाणी ढगाळ वातावरण जाणवू शकते; मात्र पावसाचा धोका नाही, असे खुळे यांनी स्पष्ट केले आहे.
Breaking News: Cold wave again, how long will the cold weather continue

















































