पाण्यात पडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
शेततळ्यात पडलेल्या शेळीच्या बकराला वाचवण्यासाठी तळ्यात उतरलेल्या १८ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना.
वावी: शेततळ्यात पडलेल्या शेळीच्या बकराला वाचवण्यासाठी तळ्यात उतरलेल्या १८ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २३) वावी येथे घडली. त्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अभिजीत अनिल काळोखे असे मृत तरुणाचे नाव आहे. अभिजीत वावी-पारेगाव रस्त्यालगत आई-वडिलांसोबत वास्तव्यास होता. नेहमीप्रमाणे शेळ्या चरण्यासाठी सोडल्यावर तो वडिलांना शेतात मदत करत होता. काही शेळया समोरच असलेल्या आसिफ शेख यांच्या शेततळ्याकडे गेल्या. अभिजीतने त्या शेळ्या तेथून हुसकावल्या. मात्र, एका शेळीचे बकरू कुंपण ओलांडून थेट तळ्यावर गेले व ते पाण्यात घसरून पडले. सध्या वापरात नसलेले सुमारे एक एकर क्षेत्रातील हे तळे पाण्याने अर्धे भरलेले होते. बकराला वाचवण्यासाठी अभिजीतने स्वतःचा शर्ट काढून झाडाच्या बुंध्याला बांधला व त्याला पकडून त्याने पाण्यात बुडणाऱ्या बकराला बाहेर काढले.
याच दरम्यान तळयातील पाण्यात असलेल्या शेवाळावरुन पाय घसरून तो पडला. त्याच्या कुटुंबियांच्या समोर हा सर्व प्रकार घडत होता. त्यांनी आरडाओरड करून आजूबाजूच्या शेतातील शेतकऱ्यांना मदतीसाठी बोलावले. मात्र, तळ्यात शेवाळ अधिक असल्याने तोपर्यंत अभिजित पाण्यात बुडाला. ही घटना समजल्यावर वावी गावातील शेकडो तरुण
मदतीसाठी धावले. पोहता येणाऱ्यांनी पाण्यात उड्या मारल्या. मात्र, तासभर प्रयत्न करूनही त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान, वावी पोलीस ठाण्यातून परिसरातील पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांना निरोप देण्यात आले. मात्र, कोणीही उपलब्ध होऊ शकले नाही. अखेर दीड तासांच्या प्रयत्नांनंतर स्थानिक तरुणांनी टायरच्या सहाय्याने पाण्यात उतरुन या तरुणास बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. सामान्य कुटुंबातील अभिजीत हा आई- वडिलांना शेतीकामात मदत करण्यासोबतच गावात मंडप बांधण्याचे तसेच मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: College youth dies after falling into the water
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App