साईदर्शनासाठी मास्क सक्ती – ‘नो मास्क नो साईदर्शन’
Shirdi News | Coronavirus Update: पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची साई संस्थानला सूचना.
शिर्डी : राज्यात पुन्हा कोरोना डोके वर काढू लागल्याने खबरदारी म्हणून साईभक्तांना ‘नो मास्क नो साईदर्शन’ अशी सक्ती केली जावी अशा सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबा संस्थानला केली आहे.
शिर्डीत मंगळवारी साईदर्शन घेतल्यानंतर विखे पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते. साई संस्थानच्या वतीने प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी विखे पाटील यांचा सत्कार केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे, प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते, माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले की, राज्यात पुन्हा कोरोनाचा नवा व्हेरियंट सक्रिय होऊ लागला आहे. या दरम्यान नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत भाविक गर्दी करत आहेत. या माध्यमातून कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. त्यामुळे साईबाबा संस्थानने शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्कची सक्ती करावी. मास्क नसेल तर दर्शनास परवानगी देऊ नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तशा सूचना दिलेल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीपोटी साई संस्थानने ‘नो मास्क नो दर्शन’ अशी सक्ती करावी. त्याचबरोबर भाविकांना साई संस्थानाने मास्कदेखील पुरवावेत अशा सूचनाही त्यांनी केल्या.
Web Title: Coronavirus update Force mask for viewing
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App