Home Crime News महानगरपालिकेच्या पाच माजी आयुक्तांवर गुन्हे दाखल

महानगरपालिकेच्या पाच माजी आयुक्तांवर गुन्हे दाखल

KDMC

कल्याण : बांधकाम परवानगीमध्ये अनियमित पद्धतीने व्यवहार केल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) पाच माजी महापालिका आयुक्तांसह तब्बल १८ जणांविरुद्ध शहर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री फसवणूक आणि अनियमितता तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील सत्ताधारी पक्षाला याबाबत सवाल केले आहेत.

क.डों.म.पा.चे माजी आयुक्त गोविंद राठोड, रामनाथ सोनवणे, एसएस भिसे, ई रवींद्रन आणि गोविंद बोडके यांच्यासह चंद्रप्रकाश सिंह, रवि राव, मारुती राठोड ADTP, सुरेंद्र टेंगले, ज्ञानेश्वर आडके, सुखदेव जाधव, रघुवीर शेळके, संजय भोळे, भागवत, सुहास गुप्ते, हरकचंद जैन, अनिल आर. निरगुडे आणि स्वत: विकासक यांच्यासह इतरत्र बदली झालेल्या माजी महापालिका आयुक्तांचा समावेश आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?

माजी अपक्ष नगरसेवक अरुण पी गीध यांच्या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कल्याण न्यायालयाच्या निर्देशानुसार कल्याण विभागातील बाजारपेठ पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तक्रारदाराच्या वकिलांनी केलेल्या तक्रारी व युक्तिवादाच्या आधारे दिवाणी न्यायाधीश अ‍ॅड. अक्षय कपाडिया आणि न्याय दंडाधिकारी सोनाली शशिकांत राऊळ यांनी १८ जानेवारी २०२२ रोजी आदेश दिला. नागरी अधिकारी आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगर नियोजकानी आणि इतर कर्मचाऱ्यांनी विकासकाशी संगनमत करून सर्व नियमांचे उल्लंघन केले आहे. तसेच निर्धारित नियमांचे पालन न करून मालमत्तेच्या विकासास परवानगी दिली आहे असे या तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले होते.

एफएसआय देण्याबाबत मालमत्ता विकासकाची अवाजवी बाजू घेण्यात आली आणि त्यानंतर अनेक अनियमित नियमाना पाठीशी घातले आहे. त्यामुळे बांधकाम नियमांचे हे सर्वजण पूर्णपणे उल्लंघन करत होते. तसेच नागरी अधिकारी आणि विकासक यांच्यातील बैठकाही इतिवृत्त म्हणून बनावट होत्या. तक्रारदाराने स्थानिक पोलीस आणि विभागीय आयुक्तांसह वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्यासाठी संपर्क साधला मात्र त्यांनी कोणतीही दखल न घेतल्याने त्यांना न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागले. बाजारपेठ पोलीस ठाण्यातील एसएचओने सांगितले की, कथित आरोपींविरुद्ध आयपीसीच्या कलम ४२०, ४१८, ४१५, ४६०, ४४८, १२० बी, आर डब्ल्यू , ३४ आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ९ आणि १३ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. हा संपूर्ण भाग जानेवारी २००४ च्या दरम्यान घडला असून पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. भूखंडावर २३ मजली स्काय स्क्रॅपर आले आहे आणि विकासकाने गॅरेजचे दुकानात रूपांतर केले आहे.

“आयुक्तांच्या पाठीवर कुणाचा हात ?” – राजू पाटील

जोरदार चर्चेत असलेल्या आणि चव्हाट्यावर आलेल्या या प्रकरणावर मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील आता समाज माध्यमांद्वारे सवाल उपस्थित केला आहे. सत्ताधाऱ्यांनो यावर काय बोलाल ? कोटींचा घाटा त्यात वाघाचा घाटा ? या आयुक्तांमागे कुणाचा हात ? यांचा कोण असेल नाथ ? असे प्रश्न त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे केले आहेत. या पोस्ट नंतर शहरातील पालिका वर्तुळात हा विषय आता आणखीनच चर्चेत आलेला आहे.

Web Title : Crime filed against five former commissioners of Kalyan Dombivali Municipal Corporation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here