देवदर्शनाला निघालेल्या खासगी बसची आणि ट्रकची धडक, अपघातात दोन जण ठार
Solapur Accident: देवदर्शनाला निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल बसची ट्रकची धडक झाल्याने दोन महिलांचा जागीच मृत्यू.
सोलापूर: पंढरपुरला देवदर्शनाला निघालेल्या खासगी बसची आणि ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. आज (रविवारी) सकाळी पुणे येथून देवदर्शनाला निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल बसची ट्रकची धडक झाल्याने दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.
टेंभुर्णी कडून पंढरपूरकडे येत असलेली भाविकांची बस (क्र.एम.एच. 14 एल.एस.3955) चा पंढरपूरकडून टेंभुर्णीकडे निघालेल्या मालवाहतूक ट्रक (क्रमांक आर जे 14 जी एल 1780) सोबत समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. पंढरपूर टेंभुर्णी रोडवरील गुरसाळे येथे बस ओव्हरटेक करत असताना अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक झाल्याने या बसमधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर सात जण गंभीर जखमी झाले.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना तातडीने पंढरपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये ट्रॅव्हल्स बसचा चालक गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे.
हे सर्व भाविक मावळ भागातील एकाच कुटुंबाचे असून बस मध्ये एकाच कुटुंबातील 27 जण होते. यातील किरकोळ जखमींवर पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. ही बस पंढरपूर वरून मंगळवेढा, अक्कलकोट, तुळजापूर या देवदर्शनासाठी निघाली होती.
Web Title: Devadarshan collided with a truck, two people were killed in the accident
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News