Home Crime News अनैतिक संबंधाची माहिती पतीला दिल्याच्या रागातून दुहेरी हत्याकांड

अनैतिक संबंधाची माहिती पतीला दिल्याच्या रागातून दुहेरी हत्याकांड

Nagpur Murder

Nagpur Murder : घराबाहेर सुरू असलेल्या अनैतिक संबंधाची माहिती पतीला दिल्याच्या रागातून महिलेने प्रियकराच्या मदतीने दोघांची निर्घृण हत्या केली. रामटेकमध्ये घडलेल्या या थरारक हत्याकांडाचा स्थानिक गुन्हेशाखा (Crime Branch) पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांच्या आतच पर्दाफाश करून मारेकरी भाची व तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या. त्यांच्यासह आणखीन दोन अल्पवयीन साथीदारांनाही पोलिसांनी हिरासतीत घेतले आहे. रितू बागबांदे (३२) व महेश भय्यालाल नागपुरे (४१) अशी अटकेतील मारेकऱ्यांची नावे आहेत.

संदीप मिश्रा (६०) आणि जयवंता भगत (४५) हे दोघेही रामटेक तालुक्यातील मौली येथे वास्तव्यास होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप हे जयवंता यांचे मानस बंधू होते. मागील सहा वर्षांपासून दोघेही रामटेकमधील एका शेतात काम करायचे व तेथेच राहायचे. दोन महिन्यांपूर्वी जयवंता यांची भाची रितू आपला प्रियकर महेश यांच्यासोबत रामटेक येथे आली होती. ते दोघेही त्यांच्यासोबत राहून अन्य शेतात काम करायचे. मात्र जयवंता यांना आपल्या भाचीचे हे कृत्य आवडत नसल्याने त्यांनी रितूच्या पतीला याबाबत सर्व काही सांगितले. यानंतर संतापलेल्या रितूच्या पतीने रामटेकमध्ये येत रितूला चांगलेच फटकारले. आणि लागलीच तो तिला सोबत घेऊन गेला.

असा काढला वचपा

आपल्या प्रेमप्रकरणाची माहिती पतीला दिल्याने रितू व महेश चांगलेच संतापले होते. याचा वचपा काढण्यासाठी रितू, महेश व त्यांचे दोन अल्पवयीन साथीदार कार घेऊन रामटेक येथे आले. त्यांनी संदीप व जयवंता या दोघांनाही बळजबरीने कारमध्ये बसविले. काही अंतरावर नेऊन संतापलेल्या महेशने कुऱ्हाडीने वार करून संदीप यांचा खून करून त्यांचा मृतदेह रामटेकमधील जंगलात फेकून दिला. यानंतर जयवंता यांचीही कुऱ्हाडीने वार करून अमानुषपणे हत्या करित त्यांचा मृतदेह भंडाऱ्याजवळील जंगलात फेकुन देत सर्वजण पसार झाले.

मंगळवारी सायंकाळी संदीप यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी पंचनामा करीत हत्येसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. तपासादरम्यान संदीप यांच्याबरोबरच जयवंता देखील बेपत्ता असल्याचे पोलिसांना समजले. पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी रामटेक मध्ये येऊन हत्याकांडाचा छडा लावण्याचे निर्देश स्थानिक गुन्हेशाखा व रामटेक पोलिसांना दिले. मगर यांच्या मार्गदर्शनाखाली रामटेकचे ठाणेदार प्रमोद मकेश्वर, स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, साहाय्यक निरीक्षक राजीव कर्मलवार, विवेक सोनवणे, जितेंद्र वैरागडे, हेडकॉन्स्टेबल गजेंद्र चौधरी, नाना राऊत, विनोद काळे, प्रणय बनाफर, वीरेंद्र नरड, रूपाली कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मारेकऱ्यांचा शोध सुरू केला.

शोधकार्य वेगात सुरू झाल्या नंतर भंडाऱ्यात जयवंता यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांना माहिती मिळाली. स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी जयवंता यांच्या मुलीशी संपर्क साधून तिच्या मुतदेहाची ओळख पटवली. यानंतर रितू आपल्या प्रियकरासह रामटेकला आल्याची माहिती स्थानिक गुन्हेशाखेकडे प्राप्त झाली. क्षणाचाही विलंब न करता स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी बालाघाट गाठले. आणि रितू व दोन अल्पवयीन मारेकऱ्यांना तात्काळ अटक केली. तर दुसऱ्या पथकाने सालेकसा परिसरातून महेशच्या मुसक्या आवळत त्याला रामटेक पोलिसांच्या स्वाधीन केले.

Web Title : Double murder in Nagpur due to anger over informing husband about immoral relationship

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here