शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर (Shirur) तालुक्यात आठ नराधमांनी एका विधवा महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी पीडित महिलेला विविध ठिकाणी घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. तब्बल सात महिन्यांनंतर हा अमानुष प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक केली आहे. सध्या न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
रज्जाक पठाण, विठ्ठल काळे, संदीप वाळुंज, नवनाथ वाळुंज, काळू वाळुंज, माऊली पवार, आकाश गायकवाड, राजेश गायकवाड अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय पीडित महिला शिरूर तालुक्यातील एका गावात एकटीच राहते. ती विधवा असून तिचा स्वभाव थोडासा भोळसर आहे. या विधवा महिलेच्या निराधारपणाचा आणि एकटेपणाचा फायदा घेत आठ जणांनी तिच्यासोबत अमानुष कृत्य केलं आहे.
आरोपींनी पीडित महिलेला तिच्या घरात, उसाच्या मळ्यात, शाळेच्या पाठीमागे आणि नदीकिनारी अशा विविध ठिकाणी घेऊन जात तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला आहे. आरोपींनी वेगवेगळ्या दिवशी एकएकट्याने महिलेला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं आहे. या अत्याचारातून पीडित महिला गर्भवती देखील राहिली आहे. सहा महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर पीडित महिलेनं याबाबतची माहिती न राहवून शेतात काम करणाऱ्या एका महिला सहकाऱ्याला दिली. त्यानंतर हळुहळू संपूर्ण गावातच ही बातमी पसरू लागली.
या धक्कादायक चर्चिल्या जाणाऱ्या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी निर्भया पथक पाठवून पीडितेची चौकशी केली आहे. तिला विश्वासात घेऊन तिची चौकशी केली असता, तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. यानंतर पीडितेचा भाऊ आणि भावजयीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. शुक्रवारी आरोपींना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
Web Title : Eight persons raped a widow in Shirur