अहिल्यानगर: पतंग उडविताना विहिरीत पडून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू
Ahilyanagar Accident: पतंग खेळताना जवळच असणारी पाण्याची खोल विहीर लक्षात न आल्याने एक आठ वर्षीय मुलगा या विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना.
शिर्डी: राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द येथे पतंग खेळताना जवळच असणारी पाण्याची खोल विहीर लक्षात न आल्याने एक आठ वर्षीय मुलगा या विहिरीत पडून मृत्युमुखी पडला. ही घटना बुधवारी 25 डिसेंबरला दुपारच्या दरम्यान घडली. सावळीविहीर खुर्द येथील पहिलीत शिकत असलेला यश हिरामण सोनवणे (वय 8) हा मुलगा नाताळची सुट्टी असल्यामुळे घरी होता. तो पतंग खेळत असताना जवळच असणार्या व कठडा नसणार्या एका विहिरीमध्ये पडला. त्याच्यासमवेत असणारी इतर लहान मुले ओरडल्यामुळे आसपासचे लोक जमा झाले.
अशोकराव जमधडे, सुधीर वर्पे, महेश जमधडे, सागर जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. शिर्डीचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कायंदे यांनी पोलीस पथकासह तात्काळ भेट दिली. साई संस्थान व शिर्डी नगरपालिकेचे अग्निशामक बंब पथकासह घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी सुमारे 50 फूट खोल विहिरीतून अडीच तासांनंतर मोठ्या प्रयत्नाने या मुलाला बाहेर काढले. परंतु तो मयत झाला होता.
पतंग खेळताना या चिमुकल्याचा जीव गेला असून परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान राहाता येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहे.
Web Title: Eight-year-old boy died after falling into a well while flying a kite
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News