अहमदनगर: दागिन्यांसाठी महिलेची गळा आवळून हत्या, शेजाऱ्याने केला घात
Breaking News | Ahmednagar: ६७ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला. एका उसाच्या शेतात जबरदस्ती नेऊन गळा दाबून ठार मारले.
राहुरी: राहुरी तालुक्यातील मांजरी शिवारात एका उसाच्या शेतात मंगळवार दि. १३ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास सुमन विटनोर या ६७ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर अवघ्या काही तासांत राहुरी पोलीस पथकाने महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळून गजाआड करत गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळवले.
राहुरी तालुक्यातील मांजरी शिवहद्दी दरम्यान एका उसाच्या शेतामध्ये मंगळवार दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान सुमन सावळेरराम विटनोर (रा. मांजरी) या वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला होता. राहुरी तालुक्यातील मांजरी येथील शिक्षक कैलास विटनोर, विलास विटनोर, भगवान यांच्या मातोश्री सुमन सावळेरराम विटनोर या रविवारी दुपारच्या दरम्यान आपल्या शेतात चक्कर मारण्यासाठी गेल्या होत्या.
मात्र, त्या उशीरापर्यंत घरी न गेल्याने सोमवारी राहुरी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांच्या नातेवाईकांनी शेतातील आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला होता. मंगळवार दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान मांजरी येथील चोपडे यांच्या उसाच्या शेतामध्ये विवस्त्र अवस्थेत सुमन सावळेरराम विटनोर यांचा मृतदेह आढळून आला. यावेळी मयत महिलेच्या अंगावरील सुमारे तीन ते चार तोळे सोन्याचे दागीने ओरबडून नेल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उप विभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे, राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलिस उप निरीक्षक चारुदत्त खोंडे, धर्मराज पाटील यांच्यासह पोलीस हवालदार सुरज गायकवाड, अशोक शिंदे, राहुल यादव, विकास साळवे, अमित राठोड, दीपक फुंदे, सचिन ताजणे, नदीम शेख, अंकुश भोसले आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर श्वान पथक व ठसे तज्ञांचे पथक घटनास्थळी हजर झाले. यावेळी श्वान घटनास्थळाच्या जवळच घुटमळले. त्यानंतर पोलीस पथकाने मृतदेह ताब्यात घेऊन आरोपीचा शोध सुरू केला.
दरम्यान पोलिसांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळताच पोलीस पथकाने मयत महिलेच्या शेजारीच राहणारा संदीप ऊर्फ संजू चोपडे याच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी चोपडे याने मयत वृद्ध महिलेला एका उसाच्या शेतात जबरदस्ती नेऊन गळा दाबून ठार मारले. त्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागीने काढून घेतले. तसेच मृतदेहाची ओळख पटू नये, म्हणून आरोपीने मयत महिलेच्या अंगावरील साडी काढून चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला.
घटना उघडकीस आल्यानंतर राहूरी पोलीस पथकाने अवघ्या काही तासांत आरोपीच्या मुसक्या आवळून गजाआड केले. आरोपी संदीप उर्फ संजू अशोक चोपडे (वय ३५ वर्षे रा. मळहद्द, मांजरी, ता. राहुरी) याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला काल न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक धर्मराज पाटील करीत आहेत.
Web Title: Elderly woman strangled to death for jewellery
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study