उद्याची मतमोजणी रद्द केल्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,
Breaking News | Election Result: सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी, म्हणजेच २१ डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई: राज्यभरातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालांबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. काही ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे सुमारे २० नगरपरिषदांची निवडणूक प्रक्रिया २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. उर्वरित निवडणुकांचे निकाल आज, २ डिसेंबरच्या मतदानानंतर उद्या ३ डिसेंबरला जाहीर होणार होते. या पार्श्वभूमीवर सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत, अन्यथा २० नगरपरिषदांच्या निकालावर परिणाम होऊ शकतो, अशा आशयाची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी, म्हणजेच २१ डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार, आज झालेल्या मतदानाची मतमोजणी देखील २१ डिसेंबरलाच होईल. तसेच, एक्झिट पोल हे २० डिसेंबरला निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर अर्ध्या तासाने प्रसिद्ध करता येतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी “देशात मनमानी सुरू आहे,” अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांसह अन्य अनेक नेत्यांनीही या निर्णयाबद्दल आपली नाराजी बोलून दाखवली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाल देताना अनेक महत्त्वाचे निरीक्षणे नोंदवली. शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्ण होईपर्यंत एक्झिट पोल जाहीर केले जात नाहीत, जेणेकरून मतदानाच्या सर्व फेऱ्या निष्पक्ष आणि मुक्त वातावरणात पार पडाव्यात. याच धर्तीवर, २ डिसेंबरचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर आणि २० डिसेंबरचा टप्पा बाकी असताना, ३ डिसेंबरला मतमोजणी जाहीर करणे कसे योग्य आहे, असा थेट सवाल न्यायालयाने उपस्थित केला. न्यायालयाने हे सर्व मतदान एकच निवडणूक म्हणून विचारात घेण्याची गरज स्पष्ट केली. लोकसभेच्या निवडणुकीत एका टप्प्यानंतर निकाल जाहीर न करता, शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रतीक्षा केली जाते. मग, या निवडणुकीत असे का नाही? असा प्रश्नही न्यायालयाने विचारला. किंबहुना, राज्य निवडणूक आयोगाने स्वतःहून हा निर्णय घ्यायला हवा होता, असे मतही नागपूर खंडपीठाने नोंदवले. या निर्णयामुळे आता सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी एकत्रितपणे २१ डिसेंबरला होणार आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीमुळे भाजपच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य निवडणूक आयोगावर मोठा घोळ घातल्याचा आरोप केला आहे. नियमानुसार बोलूनही आयोगाने ऐकले नाही. “हे चुकीच्या पद्धतीने चालले आहे,” असे ते म्हणाले. यापुढे आयोगाने हा घोळ तत्काळ संपवावा. अन्यथा, राजकीय पक्षांनी प्रचार करायचा आणि निवडणूक आयोगाने केवळ एक पत्र काढून निवडणुका पुढे ढकलायच्या, हे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या विषयावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये असा प्रकार पहिल्यांदाच घडत असल्याचे सांगितले. “घोषित झालेल्या निवडणुका पुढे जात आहेत आणि त्यांचे निकालही पुढे ढकलले जात आहेत. ही पद्धत फार योग्य वाटत नाही,” असे मत त्यांनी मांडले.
Breaking News: Election Result Raj Thackeray’s first reaction after tomorrow’s counting of votes

















































