संगमनेरात ‘त्या’ तीन प्रभागांत निवडणूक पुढे ढकलली
Breaking News | Sangamner Election 2025: तीन ठिकाणी निवडणूक पुढे ढकलली, उमेदवारांसह कार्यकर्त्याच्या उत्साहावर पाणी फेरले.

संगमनेर : संगमनेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार अगदी अंतिम टप्प्यात आला असतानाच प्रभाग १ (ब), प्रभाग २ (ब) आणि प्रभाग १५ (ब) या तीन ठिकाणी निवडणूक पुढे ढकलली असून, निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्याच्या उत्साहावर पाणी फेरले आहे.
तीन प्रभागांत नगरसेवक पदांच्या उमेदवारांबाबत न्यायालयात अपील असल्याने मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. सुधारित निवडणूक कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करणे ४ डिसेंबर, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक १० डिसेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत, आवश्यकतेप्रमाणे निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक ११ डिसेंबर, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक २० डिसेंबर सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत आणि मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक २१ डिसेंबर असा आहे.
संगमनेर नगर परिषदेचे नगराध्यक्षपद खुला प्रवर्ग महिलेकरिता आरक्षित आहे. एकूण १५ प्रभाग असून, त्यात सदस्य संख्या ३० इतकी आहे. प्रभाग १ (ब), प्रभाग २ (ब) आणि प्रभाग १५ (ब) हे वगळता येथीलच प्रभाग १ (अ), प्रभाग २ (अ), प्रभाग १५ (अ) आणि उर्वरित १२ प्रभागांत पूर्वीप्रमाणेच २ डिसेंबरला मतदान होईल.
उमेदवार, मतदार यांच्यात नाराजीचा सुर
उमेदवारांचा एका बाजूला जोरदार प्रचार सुरू असताना निवडणूक आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदानाला एक-दोन दिवस बाकी असताना नोकरी, व्यवसायानिमित्त अथवा इतर कारणांनी बाहेरगावी असलेले अनेकजण मतदानासाठी संगमनेरात आले आहेत.
काही मतदार केवळ निवडणुकीसाठी परराज्यातून आल्याचीही चर्चा आहे. निवडणूक पुढे ढकलल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असताना त्या तीन प्रभागात निवडणूक लढविणारे उमेदवार, मतदार यांच्यात नाराजीचा सुरू आहे.
Breaking News: Elections postponed in ‘those’ three wards in Sangamner

















































