हातपाय बांधलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
Breaking News | Shirur: घोडनदीच्या पात्रात अनोळखी पुरुषाचा मृतदेह (Dead body) आढळून आल्याने खळबळ.
शिरूर: शहरापासून जवळच पाचर्णे मळा हद्दीत घोडनदीच्या पात्रात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत असल्याने त्यांना मारून नदीपात्रात फेकून दिले असल्याच्या प्राथमिक अंदाज पोलिसांनी काढला आहे.
हिंगणी (ता. श्रीगोंदा, जि. नगर) गावाकडे जाणाऱ्या पाचर्णे मळ्याजवळ घोडनदीच्या पात्रात रामभाऊ पाचर्णे यांच्या शेतालगत हातपाय दोरीने बांधलेल्या अवस्थेतील पुरुषाचा मृतदेह बुधवारी घोडनदीच्या पात्रात तरंगताना आढळून आला. याबाबत हिंगणीचे पोलिस पाटील लक्ष्मण महादू वाखारे यांनी शिरूर पोलिसांना कळविल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले यांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली. बोटीच्या साहाय्याने मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर मृत व्यक्तीचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळले. मृतास अज्ञात हत्याराने मारहाण करून खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने हातपाय बांधून मृतदेह नदीपात्रात टाकला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मृत व्यक्तीचे वय तीस ते पस्तीस असून, वर्ण सावळा आहे. त्यांनी दाढी मिशा राखली असून डोक्याचे केस कुरळे आहेत. सहा फूट उंची व मध्यम बांध्याच्या या व्यक्तीच्या अंगात काळ्या रंगाची जिन पॅंट व पोपटी रंगाचा लाईनिंगचा शर्ट आहे. मृत व्यक्तीबाबत माहिती असल्यास शिरूर पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस उपनिरीक्षक उगले यांनी केले.
Web Title: Excitement after finding a dead body tied hands and feet
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study