शेतकऱ्यांनी कर्ज फेडण्याची सवय लावावी, सारखं फुकटात कसे चालणार? अजित पवारांचं वादग्रस्त विधान
Breaking News | Ajit Pawar on Farmers Loan: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता. अजित पवार पुन्हा चर्चेत आले आहेत.

बारामती: अवकाळी पावसाने त्रस्त शेतकरी सरकारी मदत आणि कर्जमुक्तीची अपेक्षा करत असताना राज्य सरकारने मात्र 30 जून 2026 पर्यंत यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल असं सांगितलं आहे. शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सूचवण्यासाठी प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात समिती आपला अहवाल सादर करणार आहे. शिफारशींचा अभ्यास करुन 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावरुन विरोधक टीकेचे बाण सोडत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पण वेळेत कर्ज फेडण्याची सवय लावावी, सारखं फुकटात कसं चालणार? असं ते म्हणाले आहेत.
बारामतीमधील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सन 2025-26 च्या 64 व्या गळीत हंगाम शुभारंभाच्या कार्यक्रमात अजित पवार सहभागी झाल होते. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी तुम्हाला बँकेने शून्य टक्के व्याजाने पैसे दिल्यावर ते वेळेत फेडायची सवय लावा ना. सारखंच फुकटात, अन् सारखंच माफ कसं व्हायचं असं ते म्हणाले.
“तुम्हाला बँकेने शून्य टक्के व्याजाने पैसे दिल्यावर ते वेळेत फेडायची सवय लावा ना. सारखंच फुकटात, सारखंच फुकटात अन् सारखंच माफ कसं व्हायचं? असं नाही चालत. एकदा शरद पवारांनी कर्जमाफी दिली. एकदा देवेंद्र फडणवीस यांनी, एकदा उद्धव ठाकरे आणि आम्ही सरकारमध्ये होतो तेव्हा कर्जमाफी दिली. आता पुन्हा महायुतीत असताना निवडून यायचं होतं म्हणून आम्हाला निवडणुकीत आम्ही माफ करू असं सांगितलं. लोक काय म्हणतात तुम्ही कर्जमाफी बोलला होता. शब्द दिला त्याला आज काही हजार कोटी रुपये लागणार आहेत ना त्याला. आजही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून दिलेली रक्कम लोक भरायला तयार नाहीत,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीबाबत वादग्रस्त विधान केलं आहे.
Breaking News: Farmers should get into the habit of repaying loans Ajit Pawar
















































