Latur Accident : लातूर शहरातील म्हाडा कॉलनी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बाप लेकीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुलीला शाळेत सोडण्यासाठी मोटरसायकलवरून लातूरला जात असताना मोटारसायकल घसरुन दोघंही रोडवर पडले. त्याचक्षणी रोडवरून धावणाऱ्या अज्ञात वाहनाखाली ते चिरडले गेले. आज सकाळी ११च्या दरम्यान ही घटना घडली आहे.
पेशाने शिक्षक असलेले दत्तात्रय कोंडीबा पांचाळ (वय ३८) हे आपली मुलगी प्रतीक्षा (वय १३) हीला लातुरातील यशवंत शाळेमध्ये सोडण्यासाठी मोटारसायकल वरुन जात असताना दत्तात्रय पांचाळ हे शहरातील म्हडा कॉलनी जवळ आले. मात्र रस्ता खराब असल्याने रस्त्यावर माती व खडक असल्याने या रस्त्यावरून त्यांची मोटारसायकल रस्त्यावर स्लिप होऊन पडल्याने बाप लेक दोघेही रस्त्यावर पडले. दरम्यान, निलंग्याहून लातूरकडे येणाऱ्या भरधाव वाहनाने दत्तात्रय कोंडीबा पांचाळ व मुलगी प्रतीक्षा यांना अक्षरशा रस्त्यावरच चिरडले.
दरम्यान, तातडीने विवेकानंद चौक पोलिस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करीत बाप-लेकीचा मृतदेह लातूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. सदर अज्ञात वाहन कोणते होते? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.
Web Title : Father and daughter killed in road accident in Latur