बीड पुन्हा हादरले; महिला वकिलास बेदम मारहाण
Breaking News | Beed Crime: भोंगा व पिठाच्या गिरणीचा आवाज यामुळे होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्याची मागणी करणाऱ्या वकील महिलेस गावातील लोकांनी बेदम मारहाण.
अंबाजोगाई (जि. बीड): गावच्या मंदिरावरील भोंगा व पिठाच्या गिरणीचा आवाज यामुळे होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्याची मागणी करणाऱ्या वकील महिलेस गावातील लोकांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथे १४ एप्रिल रोजी घडला. याप्रकरणी गावच्या सरपंचासह १० जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. मस्साओगचे सरपंच संतोष देशमुख, माजलगावातील बाबासाहेब आगे यांची दिवसाढवळ्या झालेल्या हत्या ताज्या असतानाच या घटनेने बीड पुन्हा एकदा हादरले आहे.
३६ वर्षांची वकील महिला या त्यांच्या शेतात उभ्या होत्या. यावेळी आरोपी लाकडी काठ्चा व रबरी पाइप हातात घेऊन आले. पिठाच्या गिरणीच्या व मंदिरावरील भौग्याच्या तक्रारी का दिल्यास?, यापुढे आमच्याविरुद्ध तक्रार देशील का? असे म्हणून काठचा व रबरी पाइपाने फिर्यादीला जबर मारहाण केली. तसेच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच पीडितेचे चुलते व चुलती यांनाही मारहाण केली.
बीडमध्ये ज्या महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली, तिचे फोटो मला काल रात्री उशिरा मिळाले आहेत. जे दोषी असतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. अजित पवार, उपमुख्यमंत्री
आरोपींची नावे
अनंत अंजान (सरपंच), सुधाकर अंजान, राजकुमार मुंडे, कृष्णा मुंडे, ज्ञानोबा रपकाळ, नवनाथ जाधव, मृत्युंजय अंजान, अंकुश अंजान, सुधीर मुंडे, नवनाथ मोरे (सर्व रा. सनगाव, ता. अंबाजोगाई) याप्रकरणी या १० जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
गावातील मंदिरावर लावलेल्या भौग्यांचा आवाज नेहमीच मोठा असतो. मला मायग्रेनचा त्रास आहे. माझ्या घरासमोर जाणीवपूर्वक तीन पिठाच्या गिरण्या बसविण्यात आल्या आहेत. या आवाजाचा त्रास खूप असतो. हा त्रास दूर करण्यासाठी आपण सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. तरीही दखल घेतली गेली नाही. म्हणून मी पोलिसांत तक्रार केली. तर मलाच मारहाण करण्यात आली. पीडित महिला, सनगाव (जि. बीड)
Web Title: Female lawyer brutally beaten up