अहिल्यानगर: खताच्या गोडाऊनला आग लागून सुमारे 75 लाखांचे नुकसान
Breaking News | Ahilyanagar Fire: साईनाथ अॅग्रो हायटेक गोडाऊनला मंगळवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास भीषण आग, 75 लाख रूपयांची खते, कीटकनाशके जळून खाक.
अहिल्यानगर: बुरूडगाव रस्ता येथील साईनाथ अॅग्रो हायटेक गोडाऊनला मंगळवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यात गोडाऊनमधील सुमारे 75 लाख रूपयांची खते, कीटकनाशके जळून खाक झाली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
गोडाऊन मॅनेजर निखील नारायण नरोडे यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली. मध्यरात्री अवधुत फुलसौंदर यांना गोडाऊनमधून धूर येत असल्याचे दिसताच त्यांनी नरोडे यांना फोन केला. त्यानंतर नरोडे व त्यांचे सहकारी आदित्य वाकळे व उध्दव गायकवाड घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गोडाऊन उघडून पाहिले असता, गोडाऊनच्या मागील बाजूस आग लागल्याचे दिसून आले. अवधूत यांनी अग्निशामक दलाला माहिती देताच आगीचे बंब घटनास्थळी दाखल झाले.
तासाभरानंतर आग आटोक्यात आली. आगीत धानुका अॅग्रीटेक, यारा फर्टिलायजर, आयसीएल फर्टिलायजर, आरएम फॉस्फेट, पुरवा कैमटेक, मायक्रो बँक्स या आणि इतर वीस कंपन्यांची खते, किटकनाशके, तणनाशके, बुरशी नाशके यांचा साठा जळून खाक झाला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.
Web Title: fire at a fertilizer godown caused a loss of around 75 lakhs
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study