प्रवरेला पुन्हा एकदा पूर, छोटे पूल पाण्याखाली, भंडारदरा पाणलोटक्षेत्रात धुवांधार पाउस
Breaking News | Bhandardara: निळवंडे धरणातून २२ हजार ५५० क्युसेकने पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
भंडारदरा: भंडारदरा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात शनिवारी पुन्हा एकदा पावसाने झोडपले. घाटघर येथे बारा तासांत १७० मिमी तर भंडारदरा व रतनवाडी येथे अनुक्रमे १५० आणि १४० मिमी पाऊस कोसळला. दिवसभराच्या या मुसळधार पावसामुळे भंडारदरा, निळवंडे धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत होती. ही दोन्ही धरणे काठोकाठ भरली असून, पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी भंडारदरा धरणातून १८ हजार ६० क्युसेकने पाणी निळवंडे धरणात सोडण्यात येत होते तर निळवंडे धरणातून २२ हजार ५५० क्युसेकने पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. या दोन्ही धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत असल्यामुळे प्रवरा नदीला या मोसमात दुसऱ्यांदा मोठा पूर आला आहे.
मुळा खोऱ्यातही जोर मुळा खोऱ्यातही दुपारपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे मुळा नदी दुथडी भरुन वाहू लागली असून, सायंकाळी सहा वाजता मुळा नदीचा लहित जवळील विसर्ग १३ हजार ५०० क्युसेकपर्यंत पोहोचला होता. सकाळी दहानंतर मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. पावसाचे प्रमाण वाढत चालल्यामुळे भंडारदरा धरणातून दुपारपासून पाणी नदीपात्रात सोडण्यास सुरुवात झाली. धरणात होत असलेल्या नवीन पाण्याची आवक लक्षात घेत जलसंपदा विभागाने दिवसभरात चार वेळा विसर्गात वाढ केली. निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत होता. यामुळे या धरणातील पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ होत गेली आणि निळवंडे धरणातून सोडण्यात येत असलेल्या विसर्गातही वाढ करत ती २२ हजार ५५० क्युसेक इतका करण्यात आला. यामुळे प्रवरा नदीला मोठा पूर आला आहे. यामुळे छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत. आढळा खोऱ्यातही शनिवारी दिवसभर पावसाच्या सरी बरसल्या. यामुळे आढळा आणि म्हाळुंगी या नद्याही भरून वाहत आहेत. पुढे या दोन्ही नद्यांचे पाणी प्रवरा नदीला मिळत असल्यामुळे संगमनेरच्या पुढे प्रवरा नदीपात्रात मोठी वाढ झाली आहे.
Web Title: Floods again in Pravara, small bridges under water, heavy rain
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study