अहमदनगर हादरलं! झाडाला उलटे टांगत चार मुलांना अमानुष मारहाण
Ahmednagar News: शेळी व कबुतर चोरी केल्याच्या संशयावरुन चार मुलांना शेतात नेवून झाडाला उलटे टांगत 6 जणांनी अमानुषपणे बेदम मारहाण (beaten) केल्याची मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक व अमानुष घटना.
श्रीरामपूर: शेळी व कबुतर चोरी केल्याच्या संशयावरुन चार मुलांना शेतात नेवून झाडाला उलटे टांगत 6 जणांनी अमानुषपणे बेदम मारहाण केल्याची मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक व अमानुष घटना तालुक्यातील हरेगाव येथे घडली. या घटनेच्या निषेधार्थ काल हरेगाव बंद होते. या घटनेतील आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. लहू कानडे यांनी साखर कामगार रुग्णालयात जावून जखमींची भेट घेवून विचारपुस केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, हरेगाव-उंदिरगाव येथे शुक्रवारी सकाळी युवराज नाना गलांडे, मनोज बोडखे, पप्पू पारखे, दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य, राजू बोरगे या सहा जणांनी शेळी व कबुतरे चोरल्याच्या संशयावरून गावातील शुभम माघाडे, कुणाल मगर, ओम गायकवाड, प्रणय खंडागळे यांना गलांडे यांच्या शेतातील विहिरीवर नेले. तेथे त्यांना अर्धनग्न करून अमानुषपणे मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ शुक्रवारी सायंकाळी उशिरा गावातील काहींच्या व्हॉट्सअॅपवर आल्यानंतर काही तरुणांनी घटनास्थळी धाव घेत या मुलांची सुटका केली. याबाबत शनिवारी सकाळी गावात माहिती पसरल्यानंतर या घटनेतील आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी गाव बंद ठेवण्यात आले.
माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. जखमींना येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले असून पुढील उपचार वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र जगधने व डॉ. राहुल कुलकर्णी करीत आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दशरथ चौधरी, सहायक निरीक्षक जीवन बोरसे, निकम आदींनी जमावाला शांत केले. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहे. लवकरच आरोपी अटकेत असतील असे आश्वासन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले.
हरेगाव येथील घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील आरोपींवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनास दिल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी दहशतीमुळे हा अन्याय सहन केला. दहशतीखाली लोक वावरत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. आपण स्वत: लक्ष घालून हरेगाव येथे ग्रामसभा घेणार आहोत. येथील दहशत पूर्णपणे मोडून काढण्याबाबत पोलीस प्रशासनास सूचना दिल्या आहेत. याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी चौकशी करुन कारवाईचे आदेश दिले आहे. त्यामुळे नागरिकांनी रास्तारोको मागे घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केले.
Web Title: Four children were brutally beaten by hanging upside down from a tree
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App