अहमदनगर ब्रेकिंग: पोलिसालाच जुगारींनी हल्ला करीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारले
Ahmednagar News | Shriramur: कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसालाच जुगारींनी मारहाण केल्याची घटना.
अहमदनगर | श्रीरामपूर: कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसालाच मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. कारवाईसाठी आलेल्या पोलिसावरच जुगारींनी हल्ला केल्याचे समोर आले आहे. तब्बल दहा लोकांनी खाली पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. दरम्यान ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसाची सुटका केल्याने तो बचावला. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथे शनिवारी रात्री घडली. हवालदार रवींद्र खळेकर असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव असून ते तालुका पोलिस ठाणे अंतर्गत पढेगावचे अंमलदार म्हणून कार्यरत आहेत.
याबाबत हवालदार खळेकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी बाबासाहेब रंगनाथ मांजरे, सौरभ अण्णासाहेब गायकवाड, सौरभ गायकवाड, अरुण पोपट खैरनार, सुनील बाजीराव तोरणे, भाऊसाहेब बारकू गायकवाड, सुभान बाबामिया शेख, पिंट्या खैरनार, महेश बाबासाहेब मांजरे आदींसह चार अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी आठवडे बाजार असल्याने येथे गस्त घालण्यासाठी खळेकर हे होमगार्ड सुनील देवकर व किशोर खरात यांना सोबत घेऊन गेले. दरम्यान बाजारात गस्त घालताना शाळेच्या भिंतीलगत काहीजण सोरट खेळताना त्यांना आढळून आले.
पोलिसांना पाहून त्यांनी धूम ठोकली. यात किशोर रंगनाथ मांजरे व दीपक सांवत बर्डे या दोघांना पोलिसांनी पकडले. त्यांनी या पोलिस व होमगार्ड यांच्याशी हुज्जत घालायला सुरवात केली. हे पाहून नऊ ते दहा लोक तेथे आले त्यांनी या दोघांची खळेकर यांच्या ताब्यातून सुटका करत पथकाला धक्काबुक्की करत खळेकर यांच्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवला. खळेकर हे जखमी झाल्याने स्वतःला वाचवण्यासाठी पळाले. गावातील काही लोक त्यांच्या मदतीला धावले व हल्ल्यातून सुटका केली. ही घटना घडल्यानंतर तालुक्यात विविध प्रकारच्या चर्चा सुरु आहेत.
Web Title: Gamblers attacked the policeman and kicked him
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App