संगमनेरात साडेसहा हजारांचा गुटखा जप्त
Sangamner Crime: अन्न व औषध प्रशासनाचा छापा (Raid).
संगमनेर: राज्यात गुटखा बंदी असतानाही त्याची सर्रासपणे विक्री होत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागासह पोलिसांनी अनेकदा कारवाया करुनही अवैधरित्या गुटख्याची विक्री होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. थेट अहमदनगरच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने संगमनेरात छापा टाकत सहा हजार रुपयांचा पानमसाला आणि सुगंधी तंबाखूची पाकिटे असा एकूण ६ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी कासारवाडी शिवारातील बाबासाहेब धोंडीभाऊ थोरात याच्याविरोधात भारतीय दंडसंहितेसह अन्नसुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील यांनी सदरची कारवाई केली आहे. या कारवाईत कासारवाडी शिवारातील दौलत पेट्रोल पंपासमोर कृष्णाई मिल्क कॉर्नरलगत बाबासाहेब धोंडीभाऊ थोरात (वय ५०, रा. कासारा दुमाला) याच्या ताब्यातून विमल पानमसाला, आर. एम. डी. पानमसाला व हिरा पानमसाल्याची प्रत्येकी पाच पाकिटे आणि त्यात मिसळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या नावाच्या सुगंधी तंबाखूची १५ पाकिटे असा एकूण ६ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी अश्विनी पाटील यांनी संगमनेर शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी वरील आरोपी विरोधात भारतीय दंडसंहितेच्या विविध कलमांसह अन्न व सुरक्षा मानके अधिननियमाच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील माळी यांच्याकडे देण्यात आला आहे. या कारवाईने शहरातील किरकोळ गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
Web Title: Gutkha worth six and a half thousand seized in Sangamner
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App