Hindustani Bhau : राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचं कारण देत दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार, असं शालेय शिक्षण विभागाकडून काही दिवसांपूर्वी स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी आज अचानक शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. अकोला, पुणे, नागपूर आणि औरंगाबादसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हे आंदोलन सुरू केलं आहे.
हिंदुस्थानी भाऊचा चार दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतरच विद्यार्थी आक्रमक झाल्याची सध्या चर्चा आहे. या व्हिडिओत हिंदुस्थानी भाऊनं इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तसेच दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं न घेतल्यास मोठं आंदोलन करू, असाही त्यानं इशारा दिला होता.
“कोरोनामुळं गेल्या दोन वर्षात अनेक विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले आहेत. या धक्क्यातून कुटुंब सावरलेलं नाही. आता ओमायक्रॉन आला आहे. सरकार स्वतः म्हणतेय की घरात राहा, काळजी घ्या. मग सरकार विद्यार्थ्यांचा बळी का देत आहे? प्रोफेसर ऑनलाइन बैठक घेतात. तुम्हाला तुमच्या जीवाची काळजी आहे, तर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ का करता ? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थांना ऑनलाईन शिक्षण दिलं जात आहे. मग परीक्षा ऑफलाईन का? मी तुम्हाला विनंती करतो की, विद्यार्थ्यांसोबत खेळू नका. कोरोनामुळं परिस्थिती गंभीर आहे. त्यांच्या भविष्याशी खेळू नका, त्यावेळी मी एकटा रस्त्यावर उतरलो होतो. परंतु, आता लाखो विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरणार. दहावी- बारावीच्या परीक्षा रद्द करा किंवा ऑनलाईन पद्धतीन तरी घ्या. नाहीतर एक मोठं आंदोलन उभं राहील. सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाहीतर तांडव होईल, गुन्हा दाखल केला तरी मी घाबरणार नाही”, असा धमकीवजा ईशारा हिंदुस्थानी भाऊनं व्हिडिओच्या माध्यमातून दिला होता.
Web Title : Hero of thousands of agitating students is Hindustani Bhau?