तिसरी मुलगीच झाली म्हणून पतीनं पत्नीला जिवंत जाळलं,पेट्रोल ओतून…
Husband sets wife on fire: पत्नीला तिसरी मुलगीच झाल्यानंतर संतापलेल्या पतीनं आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं.
परभणी: मराठवाड्याच्या परभणी जिल्ह्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीला तिसरी मुलगीच झाल्यानंतर संतापलेल्या पतीनं आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं. परभणीत घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या धक्कादायक घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नाका परीसरात ही घटना घडली. आरोपी कुंडलिक उत्तम काळे (३२) हा तिसरी मुलगी झाल्यामुळं पत्नी मैनाशी सतत भांडत करत असे. आरोपीकडून पत्नीला सतत शिवीगाळ केली जात होती. तीनही मुलीच कशा जन्माला आल्या, मला मुलगाच पाहीजे, या मुलींना तू तर मार नाहीतर मी मारतो, असा धोशा पतीकडून लावला जात असल्याची माहिती मृत मैना यांच्या बहिणीनं दिली आहे. तिसऱ्या मुलीच्या जन्मानंतर आरोपी कुंडलिककडून पत्नीला अनेकदा मारहाण झाली आहे. तसेच मोठ्या दोन मुलीलाही त्यानं अनेकदा मारहाण केली, असेही मैना यांच्या बहिणीनं सांगितलं.
सदर घटना गुरुवारी (दि. २६ डिसेंबर) घडली. मैना यांच्या बहिणीने सविस्तर घटनाक्रम सांगताना म्हटले की, त्यादिवशी माझी बहीण नातेवाईकांना भेटायला रुग्णालयात गेली होती. आरोपीनं तिला फोन करून बोलवून घेतलं. त्यानंतर बहीण घरी येताच तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत बहिणीच्या अंगावर पेट्रोलचा डबा मोकळा केला आणि काडीपेटीने आग लावली. एवढ्यात बहिणीने लहान मुलींना बाजूला सारून घराबाहेर धाव घेतली आणि बचावासाठी हाका मारल्या. लोकांनी काही वेळात आग विझवली, पण तेवढ्यात ती ९९ टक्के भाजली होती.
मृत मैना काळे आग लागल्यानंतर झोपडीबाहेर पळाल्या. यावेळी एका दुकानाच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये हे भयानक दृश्य कैद झालं आहे.
Web Title: husband burned his wife alive for giving birth to a third daughter
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News