संगमनेरातील अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर छापेमारी
Breaking News | Sangamner Raid: घरगुती वापराच्या गॅसटाक्या रिफिलिंग करून त्यांचा बेकायदेशीर साठा होत असलेल्या संगमनेर शहरातील विविध तीन ठिकाणांवर पोलिसांनी छापा.
संगमनेर: घरगुती वापराच्या गॅसटाक्या रिफिलिंग करून त्यांचा बेकायदेशीर साठा होत असलेल्या संगमनेर शहरातील विविध तीन ठिकाणांवर पोलिसांनी छापा टाकून भरलेल्या गॅसटाक्या, मशिन, रिक्षा, वाहने असा एकूण 15 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई पोलिसांनी शनिवारी (दि. 10 ऑगस्ट) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास जमजमनगर, जोर्वेनाका व घुलेवाडी परिसरात केली. याप्रकरणी आठ आरोपींविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर शहर व परिसरात बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग केली जात असल्याची गोपनीय माहिती श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांना समजली होती. त्यानुसार संगमनेर येथे जाऊन अशा ठिकाणावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी आपल्या पथकाला दिले. हे पथक शनिवारी सकाळी संगमनेर शहरात आले. त्यांनी याची माहिती पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना दिली. यानंतर शहराचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व इतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. पहिला छापा शहरातील जमजमनगर येथे टाकला. याठिकाणाहून पोलिसांनी मोहसीन रफीक शेख, इम्रान रऊफ शेख व इम्तियाज रफीक शेख (तिघेही रा. अलकानगर) यांच्याकडून आठ गॅस टाक्या, एक वजनकाटा, एक गॅस भरण्याचे मशिन, एक रिक्षा असा एकूण 68 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
यानंतर पथकाने दुसरी कारवाई शहरातील जोर्वेनाका परिसरात केली. येथून पोलिसांनी सोहेल शकील शेख (रा. नाईकवाडपुरा, संगमनेर) याच्याकडून एक वजन काटा, दोन रिफिल करण्याच्या मोटारी, आठ गॅस टाक्या असा एकूण 38 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर तिसरी कारवाई घुलेवाडी येथे करण्यात आली. येथून ओंकार राजेंद्र पानसरे (रा. घुलेवाडी), अविनाश राधाकिसन माळी (रा. धुमाळवाडी, ता. अकोले), जनाराम सुरेश लांडगे (रा. कासारवाडी) व संपत चिमाजी वाळुंज (रा. गणेशविहार, संगमनेर) यांच्याकडून एक कार, दोन पिकअप, 103 गॅसटाक्या, वजन काटा, रिफिलिंग करण्याच्या दोन मोटारी, रोख रक्कम 27 हजार 910 रुपये असा एकूण 14 लाख 31 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी वरील आठ आरोपींवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. एकाचवेळी तीन ठिकाणी छापेमारी झाल्याने अवैध गॅस रिफिलिंग करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
Web Title: Illegal gas refilling center in Sangamner raid
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study