बनावट नंबर प्लेट असलेल्या वाहनात आढळला अवैध मद्यसाठा
Breaking News | Nashik: ३.५ लाखांच्या मद्यसाठ्यासह कार जप्त.
घोटी : बनावट नंबर प्लेट्स लावून सिल्वास येथे तयार करण्यात आलेल्या; परंतु महाराष्ट्र, गुजरात राज्यांत विक्रीस बंदी असलेल्या विदेशी दारूची वाहतूक करणारी दोन वाहने घोटी महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केली. या कारवाईत सव्वातीन लाखांचा अवैध मद्यसाठा व दोन वाहने, असा जवळपास साडेपंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोमवारी (दि.१) दुपारी २ वाजेच्या सुमारास घोटी महामार्गावरील वैतरणा फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाई पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घोटी महामार्गावर सिल्व्हर रंगाची टोयाटो कार एमएच ०२ सीबी २०३५ व सियाज कार एमएच ४६ एएल ३८३७, अशा नंबरच्या कारमध्ये सेल्वास येथे तयार झालेल्या विदेशी मद्याची वाहतूक करणारी दोन वाहने तपासणी नाक्यावर आढळून आली.
महाराष्ट्र व गुजरात राज्यांत विक्रीस मनाई असतानादेखील अवैधरीत्या नाशिकमार्गे गुजरात व महाराष्ट्रात इतरत्र पाठविण्यासाठी चौकशीत पुढे आले. विशेष म्हणजे ज्या वाहनातून वाहतूक केली जात होती, त्या दोन्ही वाहनांचे क्रमांक बनावट असल्याचे समोर आले. या कारमध्ये अवैधरीत्या सिल्वास येथे विक्रीसाठी तयार केलेली रॉयल चॅलेंजर इम्पोरिअल ब्लू, ब्लॅक, डीएसपी, या ब्रँडचा विदेशी दारूचा माल किंमत ३ लाख १४ हजार, १७५ रुपये व वापरलेली वाहने, तसेच मोबाइल, असा १५ लाख ५४ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. छाप्यादरम्यान संशयित जहागीर मंसुरी, राहणार नवापूर हा पळून गेला.
सालेन अब्दुल सत्तार (वय ५१), चालक, राहणार निंबायत सुरत गुजरात, २) विक्रांत प्रवीण निकम (वय ३४) क्लीनर, रा नवापूर, नंदुरबार, तसेच मारुती कारचालक कडतारसिंग राजबिरसिंग जाट (वय ४८) रा. दिंडोली, सुरत गुजरात कारवाईदरम्यान पळून गेलेला जहागीर मन्सुरी, रा. नवापूर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राजू सुर्वे, घोटीचे निरीक्षक विनोद पाटील, गणेश शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
जिल्ह्यात सध्या पावसाळी पर्यटन सुरू असल्याने पर्यटनाच्या ठिकाणी अशा प्रकारच्या मद्याचा वापर होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाकडून पोलिसांनी सतर्कतेचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस देखील अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी नाकाबंदी करीत वाहनांवर कारवाई सुरू केलेली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने पर्यटनस्थळावरील गोंधळ रोखण्यासाठी उपायोजना केल्या जात आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांकडून वाहनांची देखील तापसणी केली जाते. इगतपुरी, घोटी, तसेच त्र्यंबकेश्वर परिसरातील पर्यटकांवर सध्या पोलिसांचा वॉच असल्याने गैरप्रकारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. गुजरात तसेच महाराष्ट राज्याच्या सिमांवर तसेच मुंबई, ठाणे सारख्या शहरात देखील या मद्याचा वापर होण्याची शक्याता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. पोलीसांनी ठिकठिकाणी सुरू केलेल्या वाहन तपासणी नाक्यावर अशाप्रकारचे बंदी असलेला मद्यसाठा आढळून आला आहे.
Web Title: Illegal liquor found in vehicle with fake number plate
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study